You are currently viewing स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत मालवण पेंडूर येथे महिला आरोग्य शिबिर

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत मालवण पेंडूर येथे महिला आरोग्य शिबिर

आमदार डॉ. निलेश राणे यांच्या शुभहस्ते उद्घाटन; मोफत तपासणी, उपचार व पोषणाबाबत मार्गदर्शन

मालवण :

मालवण तालुक्यातील पेंडूर ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. निलेश राणे यांच्या शुभहस्ते झाले.

या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.डी. पोळ, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, दादा साईल, दीपक पाटकर, संतोष साठविलकर, सरपंच शेखर पेणकर, पेंडूर सरपंच नेहा परब, राजन माणगावकर, आतिक शेख, शेखर फोंडेकर, विनीत भोजने, शाम आवळेगावकर, अमित सावंत, सागर माळवदे, नंदकुमार परब व अन्य ग्रामस्थ, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शिबिरादरम्यान आमदार डॉ. निलेश राणे यांनी महिलांसाठी उपलब्ध होणाऱ्या तपासण्या व उपचारांची माहिती घेतली तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांशी व उपस्थित महिलांशी संवाद साधला. त्यांनी रुग्णालयातील सोयी-सुविधांचाही आढावा घेतला.

आपल्या भाषणात ते म्हणाले, “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. घरातील स्त्री जर निरोगी व सशक्त असेल तर घराच्या प्रगतीस वेळ लागत नाही. राज्य सरकारने महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून अधिकाधिक माता-भगिनींनी याचा लाभ घ्यावा.”

या शिबिरात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी, उपचार सेवा तसेच निरोगी जीवनशैली आणि पोषणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अभियानातील अन्य आरोग्य सेवांचीही माहिती देण्यात आली असून इच्छुक नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन अधिक माहिती घेता येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा