सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सी.एस.डी. कँटीन मंजूर
माजी सैनिक रॅलीत अधिकृत घोषणा
कोल्हापूर
आज कोल्हापूर येथे पार पडलेल्या भव्य माजी सैनिक रॅलीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सी.एस.डी. (CSD) कँटीन मंजूर झाल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. मा. कर्नल कुमार रणविजय, वेटरन विभाग, सब एरिया पुणे यांनी ही घोषणा केली. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांचा तसेच मेजर जनरल डी.एस. कुशावह (जी.ओ.सी., महाराष्ट्र व गोवा, सब एरिया पुणे) आणि कर्नल बी. के. कुलोली (कमांडिंग ऑफिसर, 109 टी.ए. बटालियन, कोल्हापूर) यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक आभार व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास आय.ई.एस.एल. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट सेंटरचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, सचिव मा. दीपक राऊळ, सि.जि.से.नि.सै.संघाचे अध्यक्ष मा. विष्णु तामाणेकर, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर, कल्याण संघटक मा. माने यांच्यासह सिंधुदुर्गमधील ज्येष्ठ माजी सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबीय — वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक विधवा — आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
हा निर्णय जिल्ह्यातील हजारो माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. यामुळे त्यांना आवश्यक वस्तू व सेवा सुलभ दरात स्थानिक स्तरावर मिळणार असून, पुणे, कोल्हापूर यांसारख्या ठिकाणी जाण्याची गरज कमी होणार आहे.
माजी सैनिकांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या कल्याणासाठी घेतलेला हा निर्णय जिल्ह्यासाठी ऐतिहासिक व अभिमानास्पद ठरला आहे.
