कुडाळ :
केंद्र सरकारने पथविक्रेत्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची मुदत आता ३१ मार्च २०३० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सर्व पथविक्रेते, फेरीवाले, भाजी-फळ विक्रेते आणि हातगाडी चालकांनी घ्यावा, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीने केले आहे.
या योजनेअंतर्गत कर्ज मर्यादेत वाढ करून १५ हजार, २५ हजार आणि ५० हजार अशा टप्प्याटप्प्याने सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच, डिजिटल व्यवहार करणाऱ्यांना कॅशबॅकचा लाभही मिळणार आहे.
योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत लोककल्याण मेळावा विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.
म्हणून सर्व पात्र पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.

