*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम लेख*
*सवाष्णी*
गंगाधर भडजीनी नवरात्रीची पाहिली माळ घटावर चढवली की आईला सवाष्णींचे वेध लागत. ट्रॅंकेतल्या पैठणीला ऊन दाखवायला बाहेर काढलं जाई.द्रौपदी कडून आधी घर स्वच्छ झाडून आणि मग सारवून घेतलं जाई. दादर हून मोठे काका काकींना घेऊन आणि ठाण्याहून धाकटी काकी सुमा, कमाला घेऊन येणारच असायची पण पेणला नमू आत्याला, आणि बडोद्याला रमाताई ला रितसर पत्र जावच लागायचं. आप्पा वेळेवारी पत्र लिहायला बसत.
पण या सगळ्यांचं येणं ऐन वेळी असे तोपर्यंत थांबून चालणार नसे. आई नको, नको म्हणतं असतानाही आजी आपल्या दुखऱ्या गुडघ्यांकडे दुर्लक्ष करीत उठे आणि कामाला लागे. कानवल्यां साठी पिठी भाजायला काढी.देव पूजेची चांदीची भांडी घासायला काढणं, निमंत्रणाची यादी करणं, हव्या नको वस्तू घरात आणून ठेवणं, झालंच तर एव्हढया साऱ्यांसाठी त्या दिवशी बिरढं तयार करावं लागे. त्या साठी दोन दिवस आधीच वाल भिजत घालावे लागत. कामाला तोटा नसे. हुळू हळू घराला त्या दिवसाचे रूप यायला लागे.
घरा जवळच प्राथमिक कन्या शाळा आणि आई तिथेच शिक्षिका. त्या मुलींचा घरात सतत राबता चालू असे. घरात मुलगी नव्हतीच पण ती उणीव या मुलींनी सहजी भरून काढली होती. सवाष्णींना आमंत्रण द्यायला घरोघर फिरायचं असो की आदल्या दिवशीची जुजबी तयारी असो. दोन चार मुली हौशीने घरी येतं. आईच्या नोकरीं मुळे या कार्यक्रमाचा रविवार ठरलेलाच असे.
शनिवारी सकाळची शाळा असे. मुंबई हून रोह्यात येणारी पाहिली गाडी साधारण बारा वाजे पर्यंत पोहोचे. पण शाळेतल्या अभ्यासात जराही लक्ष नसे. कधी एकदा शाळा सुटतेय असं होऊन जाई.शाळा सुटून घरी गेलं की आमच्या एस. टी. स्टॅन्ड वर सतत चकरा चालू राहत. शेवटी पुरेसा उशीर करून एकदाची ती गाडी गावातल्या स्टॅन्ड मधे शिरे. मग उड्या मारून आम्ही गाडीत आमची माणसं असल्याची खात्री करून घेत असू. एकदाचे काय तें काका, काकी दिसलें की जीव भांड्यात पडत असे. पुढे मग तें गाडीतून खाली उतरले की भर स्टॅन्ड मधे आप्पा त्या दोघांच्या पाया पडत. आम्हीही त्यांचे अनुकरण करत असू. काका मग आम्हा साऱ्यांना प्रेमाने जवळ घेत. पुढे संध्याकाळी बडोद्याची ताई, पेण ची आत्या, ठाण्याहून त्या दोघीना घेऊन धाकटी काकी येऊन डेरे दाखल होत. यथावकाश घराला रेल्वे स्टेशन च्या प्लॅटफॉर्म चे रूप येई. सगळ्यांच्या येण्याने आजी मनोमन सुखावलेली असे.आदल्या दिवशीच तीने परात भर खाज्याचे पांढरे शुभ्र दळदार कानवले तयार केलेले असतं.रात्रीच्या जेवणासाठी ती बिरढ्याच्या खिचडीवर मुद्दाम नारळाचं दूध काढून घेई. रात्री उशिरा पर्यंत जेवणं चालत.लगेच झोपून चालणारं नसे. दुसऱ्या दिवसाची बरीच तयारी उशिरा पर्यंत चाले. आमची मधे मधे लुडबुड चाले. बिट्ट्या ला आणि सुमाला एकमेकां विना जराही करमत नसे आणि दोन क्षण हि एकमेकांशी पटत नसे. एकमेकांच्या खोड्या काढणं आणि आपापल्या मातृदिवते कडून त्या बद्दल प्रसाद खाणं चालू असे त्यातच झोपेचा अम्मल सुरु होई.
सकाळी कितीही लवकर उठलं तरी मोठ्या माणसांचा दिवस केव्हाच सुरु झालेला असे. दादा काकांच्या मार्गदर्शना खाली घरातल्या देवाची आप्पांनी सोवळं नेसून पूजा केलेली असे. देवाला वाहिलेली ताजी फुलं, उद, धूप आणि निरांजनाचा सुवास घराला एक प्रसन्न रूप येई. स्वयंपाक घरात बायकांची लगबग सुरु असे. भल्या मोठ्या पितळेच्या पातेल्यात दूध आटवायला घेतलेलं असे. आज मोठ्या मंडळींचे उपवासच असतं.
अकरा वाजल्या पासून सवाष्णी यायची सुरवात होई. आम्हाला धावून धावून पुन्हा पुन्हा त्यांना बोलवायला जावं लागे.मग सावकाशीने पूजन सुरु होई. आज घरातल्या साऱ्या बायका त्यांच्या कडे असतील नसतील तेव्हाढे दागिने आणि नव्या साडया नेसून तयार असतं. दागिने कुणाकडे. फारसे नसतंच आणि ज्यांच्या कडे तें भरपूर. होते त्या मोठ्या काकींना त्यात फारसा रस नसे. केवळ कुळधर्म म्हणून त्या बळे बळे आलेल्या असतं. आई ने कुटुंबातली परंपरीक जरीची नऊवारीहौसे ने नेसलेली असे. आजी तिला ” बघू,बघू कशी दिसतेस तें असं नक्की म्हणे ”
ताई, आत्या माहेर वाशिणी म्हणून पाटावर बसलेल्या असतं. सर्व बायका येण्या अगोदर आई त्यांना पाटावर बसवून साडी चोळीने ओटी भरत असे. खरं तर या दोघी खूप सुखवस्तू घरात पडलेल्या होत्या. पण त्यांना माहेर च्या साडीचं खूप अप्रूप असे. छान आहे, छान आहे म्हणतं ती त्या एकमेकींना दाखवत.
पुढे यथावकाश सुवासिनी पूजन सुरु होई. दादाकाका आणि आप्पा माडी वर जाऊन बसत. आमची रवानगी बाहेरच्या खोलीत होई. तरी आमचं आत लक्ष असे. एव्हाना साडे बारा वाजत येतं.
त्यांचे पाद्य पूजन, मग सोळा शृंगार, ओटी भरण सारं होई. कपाळावर रेखालेला गंधा अक्षतांचा टिळा, त्यातली हळद नाकावर पायउतार झालेली, चक्राकार अंबाड्यावर शेवंतीची घसघाशीत वेळी सोबतीला सोन पिवळी केवड्याची पात, दवणा आणि मरवा यामुळे पूजलेल्या सवाष्णींच्या चेहऱ्यावर क्षणात सात्विक भाव झळकू लागतं.त्या नंतर नमस्काराची फेरी होई. दादाकाका आणि आप्पा जिना उतरून खाली येतं आणि सगळ्या सवाष्णींनी ना खाली वाकून एकाच्या एक समायीक नमस्कर करत हास्याची एक बारीक लकेर उमटून जाई. मग आजी महाभक्ती भावाने, आई आणि काकी कर्तव्य भावनेने आणि आम्ही सारे बळे बळेच त्यांच्या पाया पडत असू. पुढे केव्हा तरी बिट्ट्या नि सवाशीनी च्या पाया पडण्या ऐवजी दोघी तिघींशी शेक हॅन्ड केला.
आईच्या सवाष्णींच्या यादीतून एखाद्या वर्षी एखादी बाई कटाप होऊन जाई. सुनील चे नाना गेले आणि पुढच्या वर्षी सुधा काकींना बोलावले नाही. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्या गेल्याच सुनीलने सांगितलं ” काल आमची आई दिवसभर रडत होती ”
ऐकून तोंड कडू कडू होऊन गेलं
श्रीनिवास गडकरी
बावधन पुणे
9130861394
