कुडाळमध्ये बोगस रस्ते कामांची चौकशी करा – अतुल बंगे
उपअभियंता धीरज पिसाळ यांच्यावर कारवाईची मागणी
कुडाळ (प्रतिनिधी):
कुडाळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) करण्यात आलेल्या बोगस रस्ते कामांची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच या विभागाचे उपअभियंता धीरज कुमार पिसाळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे पदाधिकारी अतुल बंगे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या निवेदनात श्री. बंगे यांनी 2023 ते 2025 दरम्यान कुडाळ तालुक्यात करण्यात आलेल्या सर्व रस्ते कामांची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. त्यांनी आरोप केला की, पिंगुळी ते मठ (वेंगुर्ला) आणि पिंगुळी ते पाट या दोन रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.
विशेष म्हणजे ही कामे पूर्वी 2021 साली पूर्ण झालेली असतानाही, 2023 मध्ये पुन्हा नव्याने टेंडर काढून, त्याच कामांवरून पैसे उचलण्यात आले. पिंगुळी ते मठ रस्त्यावर ₹9,68,074/- आणि पिंगुळी ते पाट रस्त्यावर ₹22,85,169/- इतकी रक्कम खर्च झाल्याचे दाखवून ती रक्कम कथितपणे हडप करण्यात आली आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात असा दावा करण्यात आला आहे की, उपअभियंता धीरज पिसाळ यांनी कार्यालयात रुजू झाल्यापासून कुडाळ तालुक्यातील रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू झाला आहे. त्यामुळे 2023 पासून आजपर्यंत झालेल्या सर्व रस्ते प्रकल्पांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आहे.
श्री. बंगे यांनी या संदर्भात विशेष चौकशी अधिकारी नेमून पिंगुळी ते पाट आणि पिंगुळी ते मठ या दोन्ही रस्त्यावरील कामांची तपासणी करण्यात यावी, आणि उपअभियंता धीरज पिसाळ यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनाची प्रत मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी, तसेच कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना देण्यात आली आहे.

