You are currently viewing सावंतवाडीत २८ रोजी ‘नमो युवा रथ’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडीत २८ रोजी ‘नमो युवा रथ’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

सेवा पंधरवड्यानिमित्त भाजपा युवा मोर्चाचा उपक्रम; पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी / प्रतिनिधी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिनी जिल्हास्तरीय ‘नमो युवा रथ’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मॅरेथॉन स्पर्धेच आयोजन करण्यात आले असून आरोग्य, नशा मुक्तीचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. ड्रग्सबाबत जनजागृती यातून केली जाणार आहे. रविवार २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, युवराज लखमराजे भोंसले व भाजप युवा नेते संदीप गावडे यांनी केले. भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सेवा पंधरवड्या निमित्ताने भाजप सेवेचे विविध उपक्रम राबविते. समाजोपयोगी सेवा उपक्रम आम्ही राबवितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मदिन १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती असा हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून देखील आम्ही सावंतवाडीत जिल्हास्तरीय ‘मॅरेथॉन स्पर्धा’ घेत आहोत. कुठल्याही वयोगटातील व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात. रविवारी २८ सप्टेंबर रोजी शिव उद्यान येथून या मॅरेथॉनचा प्रारंभ होणार आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे‌. फिट इंडिया, देशप्रेम जागवणाऱ्या या उपक्रमात सहभागी व्हा असे आवाहन युवा नेते संदीप गावडे यांनी केले.

यावेळी भाजप शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, माजी सभापती तथा जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, दिलीप भालेकर, ॲड. संजू शिरोडकर, सागर ढोकरे, पराशर सावंत, ॲड. चैतन्य सावंत, राज वरेरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा