शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर भारतीय किसान संघ आक्रमक – चार तालुक्यांत तहसीलदारांना निवेदन
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :
चालू वर्षी एप्रिलपासूनच पावसाने उशिरा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक अडचण झाली आहे. पिकांचे नुकसान, विमा योजना, वन्य प्राण्यांचा त्रास आणि शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी भारतीय किसान संघाच्या वतीने सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या चार तालुक्यांतील तहसीलदारांना एकाच दिवशी निवेदन देण्यात आले.
या निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत:
1. PM-ASHA योजनेअंतर्गत हमीभावाने भात, सोयाबीन, कडधान्ये, मका आणि कापूस यांची सरकारी खरेदी तातडीने सुरू करावी.
2. अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतनिधी वितरित करावा.
3. पिक विमा योजना मागील वर्षांप्रमाणे पुर्ववत ठेवावी.
4. ई-पिक नोंदणीसाठी मोबाईल अॅपच्या माध्यमातून ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ जाहीर करावी.
5. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेल्या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, या समस्येवर तात्काळ उपाययोजना कराव्यात.
या आंदोलनात एकूण ३८ गावांतील शेतकरी सहभागी झाले होते. तहसील कार्यालयांमध्ये निवेदन देताना शेतकऱ्यांनी आपले दुःख व्यक्त करत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
भारतीय किसान संघाच्या वतीने सांगण्यात आले की, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.

