*जीएसटी बचत उत्सव साजरे करणारे गेल्या आठ वर्षातील जीएसटी लुटीचा उत्सव कधी साजरा करणार-
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख.*
सिंधुदुर्ग
जीएसटीचे दर कमी केले म्हणून सत्ताधारी जीएसटी बचत उत्सव साजरा करीत आहेत. जसे काही जीएसटीचे वाढीव दर होते ते पूर्वीच्या काँग्रेस सरकारने अथवा नेहरूनी हे दर जनतेवर लादले होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदीनी ते दर कमी करून जनतेला दिलासा दिला आहे असे चित्र रंगवून जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न भाजप व सत्ताधारी करत आहेत. आठ वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाजावाजा करून 28 टक्के पर्यंत जीएसटी लाऊन गेली आठ वर्षे जनतेला लुटण्याचे काम केले. आठ वर्षे जनतेला लुटून झाल्यावर 18 टक्के पर्यंत जीएसटीचे दर कमी करून जीएसटी बचत उत्सव साजरा करीत आहेत. मग गेली आठ वर्षे 28 टक्के जीएसटी लाऊन जनतेच्या पैशांची लुटमार करणारे या जीएसटी लुटीचा उत्सव कधी साजरा करणार? असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी भाजप व सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.
आठ वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची लुटमार करणारा जीएसटी लाऊन जनतेची लुटमार सूरू केली तेव्हांच काँग्रेस पक्षाचे आदरणीय राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी या करप्रणालीला विरोध करत हा गब्बरसिंग टॅक्स आहे. या मध्ये बदल करून तो 18 टक्के पर्यंत आणला पाहिजे अशी मागणी संसदेत तसेच संसदे बाहेर केली होती. परंतू त्यावेळी नरेंद्र मोदी आणि भाजपने राहुल गांधींची टिंगलटवाळी करण्यात धन्यता मानली. राहुल गांधी संसदेत आणि संसदेच्या बाहेर वारंवार जीएसटीचे दर कमी करण्यासाठी गेली आठ वर्षे आवाज उठवत राहिले, संघर्ष करीत राहिले आणि सरकारला राहुल गांधींच्या संघर्षासमोर झुकावे लागले आणि जीएसटीचे दर कमी करावे लागले. *गिरे तो भी टांग ऊपर* या उक्तीनुसार जीएसटी कमी केला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप जीएसटी बचत उत्सव साजरा करीत आहेत. गेली आठ वर्षे चढ्या दराने जीएसटी घेऊन जनतेला लुटल्या बदल भाजपने जनतेची माफी मागितली पाहिजे आणि गेली आठ वर्षे लुटलेला जनतेचा पैसा कधी परत करणार हे सांगीतले पाहिजे.जीवनावश्यक वस्तूंवर, शेतकऱ्यांच्या अवजारावर,खतांवर जीएसटी लावणारे सरकार किती निर्लज्ज आहे याचा अनुभव जनतेला आला आहे अशी टिका इर्शाद शेख यांनी केली.

