You are currently viewing अमित शहांनी कितीही ताकद पुरवली तरी शिवसेना नारायण राणेंना धुळ चारल्याशिवाय शांत राहणार नाही…!

अमित शहांनी कितीही ताकद पुरवली तरी शिवसेना नारायण राणेंना धुळ चारल्याशिवाय शांत राहणार नाही…!

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

आमदार वैभव नाईक

केंद्रीय ग्रुहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणेंना भाजपमध्ये वाट्टेल तितकी ताकद पुरविली तरी येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना नारायण राणेंना पुन्हा एकदा धुळ चारून भगवा फडकवल्याशिवाय शांत राहणार नाही. या अगोदर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महसुल मंत्री, उद्योग मंत्री अशी मोठमोठी पदे देऊन नारायण राणेंना ताकद पुरवण्याचा खटाटोप केला होता. त्यावेळी नारायण राणेंचा माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दहा हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. त्या पराभवाची नारायण राणेंनी इतकी धास्ती घेतली की २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून निवडणूक न लढवता त्यांनी अक्षरशः रणांगणातून पळ काढला. दरम्यान काँग्रेस पक्षही त्यांना सोडावा लागला होता. त्यामुळे राणेंना ताकद पुरवताना ते पुन्हा एकदा शिवसेनेला घाबरून निवडणुकीच्या रणांगणातून पळ काढणार नाहीत याची खातरजमा शहांनी करून घ्यावी. अशी घणाघाती टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले, जर नारायण राणेंनी सर्व धैर्य एकवटून पुढची विधानसभा निवडणूक लढवली तर त्यांना चारी मुंड्या चीत करून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा भगवा फडकवण्याची जबाबदारी बाळासाहेब आणि उद्धवजींचा शिवसैनिक म्हणुन सर्वस्वी माझी राहिल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचा उल्लेख ‘महाराष्ट्राचे दबंग नेते’ असा केला. मग या दबंग नेत्याला भारतीय जनता पक्षात प्रवेश देताना ‘तारीख पे तारीख’ देऊन वर्षभर ताटकळत का ठेवले होते…? या प्रश्नाचे उत्तर सुद्धा फडणवीसांनी द्यायला हवे होते. या कार्यक्रमात अमित शहा नारायण राणेंच्या वेगवेगळ्या प्रतिमांविषयी बोलत होते. नारायण राणेंची नेमकी प्रतिमा काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षापुर्वी विधानपरिषदेच्या सभाग्रुहात नारायण राणेंवर केलेल्या भाषणाचा व्हिडिओ त्यांनी आवर्जुन पाहावा. त्या व्हिडिओमध्ये फडणवीसांनी नारायण राणेंनी केलेल्या गुन्ह्यांची कुंडली मांडून भर विधानपरिषदेत त्यांचा पोलखोल केला होता. जेणेकरून नारायण राणेंनी भुतकाळात काय काय दिवे लावलेत आणि त्यांची प्रतिमा किती उजळलेली आहे हे शहांच्या लक्षात येईल.

अमित शहांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दाखले दिले आणि शिवसेना संपवण्याची भाषा सुद्धा केली. ते कदाचित विसरले असतील की सोळाव्या शतकात आपल्या अफाट ताकदीच्या जोरावर अफजलखान शिवाजी महाराजांचे स्वराज्य संपवून टाकण्याचा विडा उचलून दिल्लीतून इकडे महाराष्ट्रात आला होता. महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचे थडगे बांधले. शिवसेना संपवण्याची भाषा करण्याअगोदर महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास त्यांनी एकदा तपासून पाहावा. *अमित शहा असेही म्हणाले की शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार तापी नदीत बुडवले. मग जम्मु काश्मीरमध्ये पीडीपीच्या महबुबा मुफ्तीसोबत भाजपने युती करून सत्ता स्थापन केली होती, तेव्हा आरएसएसच्या हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, नानाजी देशमुख या नेत्यांचे विचार शहांनी कोणत्या नाल्यात बुडवले होते…?* आता सुद्धा बिहारमध्ये नितीश कुमारांसोबत भाजप सत्तेत आहे. मग बिहारमध्ये तथाकथित हिंदुत्ववादी भाजप सेक्युलर बनलीय की सेक्युलर जेडीयु हिंदुत्ववादी बनलीय याचेही उत्तर त्यांनी एकदा द्यायला हवे. शहांच्या मते महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी जनादेश दिलेला असताना महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला. मग गोव्यात आणि मध्य प्रदेशात भाजपला जनादेश मिळाला होता का…? जनादेश हा शब्द सुद्धा भाजपच्या मंडळींनी उच्चारू नये. त्याच्याशी तुमचा काडीमात्र संबंध नाही. निवडणुकांमध्ये जनतेने नाकारले असेल तर ‘ऑपरेशन लोटस’च्या गोंडस नावाखाली अमर्याद पैशांचा वापर करून आमदारांची फोडाफोडी करायची आणि या-ना-त्या प्रकारे सत्ता हस्तगत करायची, ही भाजपची कार्यपद्धती आहे. *देशाच्या राजकारणात घोडेबाजार हा शब्द उदयास येण्यासाठी सर्वस्वी भारतीय जनता पक्ष कारणीभूत आहे.* महाराष्ट्रात देखील पहाटे पहाटे सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे नापाक मनसुबे अयशस्वी झाल्यामुळेच (कोल्ह्यांना द्राक्षे आंबट या म्हणीप्रमाणे ) भाजपला एकाएकी लोकशाहीतील जनादेशाची आठवण झाली आहे. ‘हम करे तो रासलीला और बाकी करे तो कॅरेक्टर ढिला’ त्यातलाच हा प्रकार म्हणावा लागेल.

अमित शहा म्हणाले की २०१९ विधानसभा निवडणुकीत मोदींचा फोटो वापरून शिवसेनेने मते मिळवली. त्यांच्या माहितीसाठी सांगु इच्छितो की २०१४ विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर शिवसेना संपुर्ण महाराष्ट्रात स्वबळावर लढली होती. त्यानंतर विधानसभेत आवाजी मतदानाचा प्रयोग अंगाशी आल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी भाजपलाच शिवसेनेची गरज भासली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युती तुटल्यानंतर शिवसेनेने स्वबळावर सत्ता स्थापन केली. २०१९ लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने स्वबळाचाच नारा दिला होता. लोकसभा निवडणुकीत संपुर्ण महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढली तर भाजप नामशेष होईल याची भीती वाटल्यानेच दिल्लीच्या गर्विष्ठ माना मातोश्रीसमोर झुकल्या. जगातला सर्वात मोठा पक्ष अशी बतावणी करणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना युतीची बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उंबरे झिजवावे लागले, यातच शिवसेनेची ताकद दिसुन आली. त्यामुळे शिवसेनेने मोदींचा फोटो वापरून मते मागितली अशा प्रकारची बालिश वक्तव्ये करणे बंद करा. उलटपक्षी देशाचे पंतप्रधानपद पुन्हा भूषवण्यासाठी नरेंद्र मोदींनाच शिवसेनेची गरज भासली आणि त्यामुळेच अमित शहा एकदा नव्हे तर दोनदा नाक घासत मातोश्रीवर आले, ही वस्तुस्थिती आहे. शहा म्हणाले की बंद खोलीत महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे वचन दिले नव्हते. बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या तिघांनीही पत्रकार परिषद घेतली होती. ती पत्रकार परिषद साऱ्या महाराष्ट्राने पाहिली. त्या पत्रकार परिषदेत सत्तेच्या पदांचे समसमान वाटप होईल असे शहांनी स्पष्ट केले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हे सत्तेतीलच एक पद नव्हे का…? मग शिवसेनेने सत्तेचे समसमान वाटप या भुमिकेशी बांधील राहुन अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितले तर त्यात चुक काय…? शिवसेनेने कुठेही पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाची अवास्तव मागणी केली नव्हती. शिवसेना सत्तेतील न्याय्य वाटा मागत होती. शिवसेनेच्याच पाठिंब्यावर २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षे भाजपने मुख्यमंत्रीपद उपभोगले होते. त्यामुळे शहांनी बंद दरवाजाआड दिलेला शब्द मोडला हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय विश्लेषकाची गरज नाही. उद्धवजी ठाकरे व अमित शहा यांच्यात बंद दाराआड बैठक झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना सांगितले. त्यामुळे अमित शहा खोटे बोलतात की फडणवीस हे त्यांनाच ठाऊक.! तसंही फसवणूक करणे हा सध्याच्या भाजप नेत्यांच्या रक्तातलाच गुण आहे. सिंधुदुर्गात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतहि भाजप पक्षाने शिवसेनेशी गद्दारी केली होती. शिवसेनेच्या कुडाळ, व सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार उभे केले होते त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक ताकदहि पुरविण्यात आली होती. मात्र शिवसेनेने त्यांनाहि धूळ चारली. भाजपच्या सगळ्या बंडखोर उमेदवारांचा शिवसेनेने सुपडा साफ केला कोकणात केवळ एकच सीट भाजपची निवडून आली. त्यामुळे कोकणात भाजप १ नंबरचा पक्ष करण्याच्या घोषणेवर पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांनी विचार करावा. शिवसेना संपविण्याचे नारायण राणेंनी अनेकदा आव्हान दिले मात्र ते आव्हान शिवसेनेने वेळोवेळी परतवून लावले. नारायण राणे व त्यांच्या मोठ्या मुलाला निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग वासियांनी नाकारले आहे. याची आठवण आ. वैभव नाईक यांनी करून दिली.
अटल बिहारी वाजपेयींच्या काळात एनडीएमध्ये तीस पेक्षा जास्त पक्ष समाविष्ट होते. आज नरेंद्र मोदींच्या काळात एनडीएमध्ये तीन-चार पक्ष सुद्धा शिल्लक उरलेले नाहीत. भाजपची शीर्षस्थ नेतेमंडळी विश्वासास पात्र नसल्यामुळे एनडीए मधून एक-एक प्रादेशिक पक्ष कमी झाला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विदेशातील काळा पैसा भारतात आणुन प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये १५-१५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन भाजपने देशातील जनतेला दिले होते. या आश्वासनाला भुलुन अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान केले. सत्तेत येताच भाजपला या आश्वासनाचा विसर पडला. एकदा एका मुलाखतीदरम्यान पत्रकार किशोर अजवाणी यांनी अमित शहा यांना १५ लाख रुपयांच्या आश्वासनाबद्दल विचारले असता शहा यांनी क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले होते की, “वो चुनावी जुमला था…” याचाच अर्थ निवडणुकांच्या दरम्यान देशातील जनतेसोबत व सहयोगी पक्षांसोबत काहीबाही खोटी आश्वासने देऊन जुमलेबाजी करणे हा भाजपचा स्थायीभावच आहे, हे स्वतः अमित शहांनीच टीव्ही इंटरव्युमध्ये मान्य केले आहे. त्यामुळे इतर प्रादेशिक पक्षांबरोबर, जनतेचाही विश्वासघात भाजपने केला यावर शिक्कामोर्तब झाल्याचा आरोप आ. वैभव नाईक यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा