*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा अध्यक्ष, कोमसाप सावंतवाडी लिखित अप्रतिम ललित लेख*
*||…नवदुर्गा…||*
हिंदू धर्म म्हणजे सणांची मांदियाळी..! त्यात सर्वांचा आवडता गणेशोत्सव… गणेशाचे लोचनांना तृप्त करणारं अलौकिक रूप डोळ्यात साठवून “पुढल्या वर्षी लवकर या” असं वचन घेत भावस्पर्शी निरोप देतो अन् मनाला हळवं करत पितृपक्ष येतो. पूर्वजांच्या आठवांनी उर भरतो..कंठ दाटून नकळत नयनांच्या कडांना ओलसर करून जातो.. हा पंधरवडा म्हणजे जणू नभांगणी काळे ढग दाटून यावेत अन् सूर्याच्या सोनेरी किरणांनी त्यांच्या आड दडून बसावं.. उदासीनतेने मनांगणावर राज्य करावं असा करुणेने भरलेला असतो…,
पण..,
नकारात्मकतेच्या मागून सकारात्मकता येतेच.. दुःखाच्या नंतर सुख पदरी पडते…अगदी तशीच नवरंगांची उधळत करत चैतन्य लेवून नवरात्री येते..अमावास्येचा अंधकार दूर सारून सोनेरी पहाट उगवते.. ती म्हणजे प्रतिपदा..! तो पवित्र दिन म्हणजे घटस्थापना..!
रविराजाचे आगमन होण्यापूर्वीच घराच्या सुवासिनींची लगबग सुरू होते.. पाठीवर रुळणारे ओले केस अन् त्यावरून टपटप गळणाऱ्या मोत्यासारख्या जल थेंबांनी अंग अंग शहारून येतं..आणि तयारी सुरू होते अंगणात सडामार्जन करण्याची.. आदिशक्ती अंबाबाई घरी अवतरणार तिच्या स्वागताची. पहाटेची पक्षांची किलबिल अन् सुवसिनीच्या मुखात नकळत रुळणारी मंजुळ गाणी, तिच्या पायीच्या पैंजनांची छनछन आणि मनगटीच्या कंकणांची किणकिण सुरात सूर मिसळून सुरेल गीत गात असतात.. दारी रांगोळीचे सडे सजतात..अंगणातील पारिजाताचा गंध हवेत पसरतो..अन् घरची लक्ष्मी आदिशक्तीच्या आगमनाची तयारी करतानाच आई अंबाबाईचा वास घरात असल्याचा भास होतो..
आनंद, उत्साह अन् हर्षाने घर-अंगण दुथडी भरून वाहणाऱ्या सरितेसमान भरून वाहतं… दीपधूपाचा दरवळ घरभर पसरतो..आणि सौभाग्याचं दान पदरी टाकणाऱ्या आई अंबेच्या स्वागतास घर सजून सवरुन तयार होतं..
गृहलक्ष्मीचं स्वागत करणं म्हणजे मनाला आनंदाची भरती येणं.. पहाटेपासून तयारीस लागलेले हात न थकता चालत असतात.. जणू अंगास आई अंबाबाई नवं स्फूर्ती प्रदान करते.. हवेतील हलक्या गारव्याने मुखमंडलावर प्रसन्नता येते..हास्याची हलकी लकेर उमटते.. शुचिर्भूत झालेली सुवासिनी देव्हाऱ्याकडे वळते..
देव्हाऱ्यातील देव जणू तिच्या भक्तिमय स्पर्शाला आसुसलेले होते.. देवीची मूर्ती, फोटो साऱ्यांना न्हाऊमाखू घालून शुभ्र कपड्याने स्वच्छ पुसून ती देव्हाऱ्यात मांडते..
साणीवर गंध उजळताना चंदनाची कांडी जसजशी गोल गोल फिरते तसतसा चंदनाचा गंध देवघरात पसरतो..फुलांच्या परडीतून झेंडू, लाल गुलाबी जास्वंद, शुभ्रधवल तगर, पिवळा चाफा मान वर करून डोकावून पाहत असतात.. चंदनाचा लेप अंगी लावून मातेच्या चरणांवरती अर्पण होण्याची संधी कुणाला मिळते याची ती जणू प्रतिक्षाच करत असतात.. हळद कुंकवाचा करंडा लाल पिवळा होऊन शेजारी येऊन बसतो.. पितळीच्या दिव्यातील साजूक तुपात कापसाची वात तुडुंब डूबते, न्हाऊन घेते.. धुपबत्ती, अगरबत्तीच्या सुगंधी धुराची वलये हवेत तरंगत उडत राहतात..अन् मांगल्याचा दिन आल्याची जाणीव होते..
रांगोळीच्या सप्तरंगात पाट सजतो..पाटावर गहू पसरून त्यावर नाणे, सुपारीस संग घेत जलभारीत कलश विराजमान होतो..वर गव्हाने भरलेले ताम्हण अन् देवीचा टाक विराजित होतो.. चंदन गंधित झेंडूची फुले, हळदकुंकू अन् अक्षता देवीच्या चरणांवर अर्पण होतात.. पाटासमोर शंख, घंटा वाजविण्याची वाट पाहत उभे असतात.. पत्रावळीवर शेजारीच मातीत पंच धान्याचे रुजवण घातले जाते.. रोज झेंडूच्या फुलांची माळ घालून कलशाची पूजा केली जाते.. नवरात्रात तिने बसविलेला हा घट म्हणजेच पंचमहाभूतांचे प्रतीक..! ती पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, आप, तेज, वायू.. घटस्थापना करून या पंचमहाभूतांमध्ये वसलेल्या देवांना ती घरात येण्याचे निमंत्रण देते..चराचरात सामावलेली ऊर्जा घरात एकवटते अन् देवीच्या आगमनाने नवचैतन्य उत्साह अन् ऊर्जा घरात येते..
*देहि सौभाग्य आरोग्यं देहि मे परमं सुखम्।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि।।*
नकळत भक्तीपोटी तिचे हात आपोआप जोडले जातात.. डोळे मातेच्या दर्शनाने भरून येतात.. “माते जास्त काहीच नको गं…आई अंबे आदिशक्ती तुझा वास अन् सहवास घरात सदैव लाभू दे.. माझं सौभाग्य म्हणजे पती, भविष्य म्हणजे माझी मुलेबाळे, तुझी लेकरे सर्व सुखी राहू दे.. घरसंसार सुखात असू दे अन् माते तुझ्याच सेवेत आनंदात जीवन जगू दे..तुझी कृपा सदैव माथ्यावर असू दे.. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे.. शेतात जे पेरलं ते तुझ्या कृपेने शेरास सव्वाशेर एवढं पिकू दे.. सासर माहेर सुखात नांदू दे…” अशी विनवणी करून जणू ती थेट मातेच्या हृदयाला हात घालते..अन् नकळत मातेस आपल्या हृदयी विराजित करते…
खणा नारळाने मातेची ओटी भरते..पाच वेळा तांदूळ नारळावर अर्पण करून मग सुवासिक फुलांचा गजरा तिच्या कपाळी माळते..सुका मेवा, पंचफळे प्रसाद ठेऊन आईचा शृंगार करते.. “आई अंबे मजला देताना तू सूप भरून दान पदरी दिलेस..ते अक्षय राहू दे…आज मजकडून तुझी ओटी भरून घेताना पोसाभर धान्य सुख मानून घे..” असं म्हणत हळद कुंकू तिच्या चरणी वाहते… आईच्या चरणावरचे चिमुटभर कुंकू पदराला बांधते.. अन् चरणी वाहिलेल्या कुंकवाने लाल झालेले हात नकळत भाळी फिरवताच तिला कृतार्थ वाटते…ती धन्य धन्य होते..
“माते तूच तर आमची अन्नदात्री.. पण तरीही मी तुझा उपवास करते.. का ..?
तू माझ्यावर प्रसन्न व्हावी म्हणून नव्हे गं..
मी उपवास करते ती आंतरिक शुद्धी होण्यासाठी..!
“चवीचे खाणार त्याला देव देणार” असं म्हणत नेहमीच तेलकट, तुपकट, मसालेदार खाणे खाऊन आपले आरोग्य, शरीर प्रणाली बिघडवून ठेवतो.. पण, नऊ दिवस तुझे उपवास केल्याने प्रणाली शुद्ध होते, चेहरा तुकतुकीत अन् शरीर टवटवीत, तजेलदार होते. काहीतरी मिळविण्यासाठी नव्हेच तर आरोग्य सुधारण्यासाठी मी उपवास करते..”
एवढ्यात हातातील हिरवा चुडा किणकिण वाजतो..जणू मांगल्याचा ध्वनी त्यातून परावर्तित होत राहतो..
घटाच्या समोरचा लामनदिवा सदैव तेवत राहतो.. दिव्याच्या वातीच्या मंद प्रकाशात आयुष्यातील अंधकार दूर होतो.. पहाटेपासून आईची पूजादी सोपस्कार सोहळे होत राहतात.. दुपारी नैवेद्याने भरलेलं केळीचं पान समोर ठेवलं जातं.. नैवेद्य अर्पण होताच घंटानाद निनादतो.. पंचारती मध्ये कर्पुर जळू लागतो.. कर्पुराच्या गंधात, टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन होऊन देवीची आरती मुखामुखातून वदते..
*दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी*
*अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी*
*वारी वारी जन्म-मरणाते वारी*
*हारी पडलो आता संकट निवारी*
आदिशक्तीचा गजर होतो… *”उदो गे अंबे उदो…”*
*”अंबाबाईचा उदो उदो…”*
आदिशक्तीने भरभरून दिलेल्या कृपाशीर्वादासाठी ती आईचे आभार मानते..
अन्….
आदिशक्तीचे स्वरूप मानली जाणारी स्त्री अजुनी भय, भीतीच्या सावटा खाली जगते म्हणून चिंतित होते.. तिच्यावर होणारे अन्याय, अत्याचार यांच्याशी लढण्याची ती ताकद मागते.. “आई पावलोपावली तू पाठीशी रहाच..पण पुढे येणाऱ्या संकटाला परतवून लावण्याचे बळ अंगात भर… मजकडून सत्कृत्य घडू दे, दुष्कृत्य करणाऱ्यांना तूच महिषासुरमर्दिनी होऊन धडा दे..” असे आर्जव करते…
© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी, सिंधुदुर्ग
८४४६७४३१९६

