*आगामी निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज*
सिंधुदुर्ग : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांच्या अनुषंगाने जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी (महसूल व गृह), तहसिलदार व पोलीस निरीक्षक हे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी शेवाळे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना, प्रस्तावित मतदान केंद्रांची संख्या, मतदारसंख्या आणि संबंधित संक्षिप्त माहिती दिली. तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आगामी निवडणुका पारदर्शक, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.
जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी निवडणूक काळातील कायदा व सुव्यवस्थेसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत स्पष्ट निर्देश दिले. यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई, आचारसंहिता कालावधीत करावयाची कार्यवाही, प्रत्यक्ष मतदानावेळी आवश्यक व्यवस्था, अनधिकृत वाहतूक व शस्त्रसाठा रोखणे तसेच विविध गैरप्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर यांनी निवडणुकीदरम्यान होऊ शकणाऱ्या गुन्हेगारी कारवायांवर आळा घालण्यासाठी पोलीस दलाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

