You are currently viewing लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य; पात्र महिलांनी लवकर पूर्ण करा

लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य; पात्र महिलांनी लवकर पूर्ण करा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी “लाडकी बहीण योजना” अंतर्गत आता सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयाचा उद्देश योजनेत पारदर्शकता आणणे, गैरप्रकार टाळणे आणि लाभ फक्त गरजू महिलांपर्यंत पोहोचेल याची खात्री करणे हा आहे.

महिला व बालविकास विभागाने या संदर्भात परिपत्रक जारी केले असून, पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. आधार कायद्यातील तरतुदीनुसार, कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेसाठीही लाभार्थ्यांची पडताळणी ई-केवायसीद्वारे केली जाणार आहे.

ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी?

१. लाभार्थी महिलांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया सुरू करावी.

२. या प्रक्रियेत महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती अपलोड करावी लागेल.

३. आवश्यक माहितीमध्ये नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल.

४. सर्व माहिती अपलोड केल्यानंतर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल.

सध्या तांत्रिक कारणांमुळे पोर्टल पूर्णपणे सुरू नाही. मात्र, शासनाने लवकरच ती सुरू होईल असे सांगितले आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी वेबसाइट वेळोवेळी तपासत राहावे आणि प्रक्रिया सुरू होताच तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा