भिगवण : पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर डाळज क्र. २(ता.इंदापुर) येथे फॉर्च्युनर गाडीने ट्रॅक्टरला पाठीमागुन धडक देऊन झालेल्या भीषण अपघातांमध्ये एकाच कुटुंबातील आई, वडील व मुलगा अशा तिघांचा दुदैवी मृत्यू झाला आहे तर मुलगी व चालक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (ता.०७) रात्री अकराच्या सुमारास झाला. अपघात इतका भीषण होता की गाडीतील जखमी व मयत यांना अक्षरशः ट्रॅक्टर व क्रेनच्या सहाय्याने गाडीतुन बाहेर काढावे लागले.
गीता अरूण माने (वय ३६), मुकुंद अरुण माने (वय२५) व अरुण बाबुराव माने (वय ४५ रा. सर्व रा लातूर) यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे तर साक्षी अरुण माने (वय १८) व चालक महादेव रखमाजी नेटके (वय ५६) हे अपघातांमध्ये गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ”ट्रॅक्टर चालक गोरख मल्हारी बिडबाग हे त्यांच्याकडील ट्रॅक्टरमधून( क्र. एम.एच.४५ एफ ७७७९) करमाळा तालुक्यातील केतूर येथील ऊस भरुन पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरुन माळीनगर येथील कारखान्याकडे निघाले होते. डाळज क्र. २ (ता.इंदापुर) येथे पुण्याहून लातुरकडे निघालेल्या फॉर्च्युनर गाडीने (क्र. एम.एच.२४ ए.टी.२००४)ने ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. अपघातामध्ये गाडीतील गीता माने, मुकुंद माने व अरुण माने या आई वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची मुलगी साक्षी माने व चालक महादेव नेटके गंभीर जखमी झाले आहे. अपघात इतका भीषण होता की गाडीतील जखमी व मयत यांना अक्षरशः क्रेन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाडीतून बाहेर काढण्यात आले.
अपघातातील जखमी चालकांवर येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत तर साक्षी माने हिच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुभाष रुपनवर करीत आहेत.