कुडाळ / प्रतिनिधी :
कर्मचाऱ्यांच्या सुख दुःखात धावणारे, कर्मचाऱ्यांना कधीही न दुखवणारे, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे करणारे आणि जनतेच्या समस्यांना न्याय देणारे अशा भावना प्रतिनिधींसह कर्मचारी व्यक्त केल्या. कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या बदलीपर निरोप समारंभ कुडाळ येथे आयोजित करण्यात आला होता.
कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांची बदली कोकण भवन येथे सहआयुक्त म्हणून झाली. त्यांची बदली झाल्या नंतर कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. या समारंभाला नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, मुख्याधिकारी अरविंद नातू, सौ. नातू, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, गटनेता विलास कुडाळकर, मंदार शिरसाट, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, श्रुती वर्दम, आफरिन करोल, अक्षता खटावकर, नगरसेवक अभिषेक गावडे, उदय मांजरेकर, संतोष शिरसाट तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निरोप समारंभावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले की, माझ्या नगराध्यक्ष कालावधीमध्ये अधिकारी यांनी मला चांगल्या प्रकारे सहकार्य केले. ज्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता होती त्या ठिकाणी मार्गदर्शन केले. त्यामुळे शहराच्या संदर्भातील जे निर्णय आवश्यक होते ते घेता आले. पुढील काळात त्यांचे सहकार्य आम्हाला निश्चित लागणार आहे. जे प्रकल्प आम्ही हाती घेतले आहेत त्या प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभाला नक्कीच त्यांना आम्ही आमंत्रित करू असे त्यांनी सांगितले.
तर यावेळी मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी म्हणाले की, या नगरपंचायतीमध्ये मला अनेक अनुभव आले.लोकप्रतिनिधींची साथ ही मला मिळाली. कर्मचाऱ्यांनी तर मला कुटुंब प्रमाणे सांभाळले. त्यांचे हे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. कर्मचाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये अनेक कर्मचारी भावनिक झाले. मुख्याधिकारी अरविंद नातू यांचे स्वागत त्यांनी पुष्पवृष्टी करून केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधीक्षक राजू पठाण यांनी केले.

