You are currently viewing मी भारूड लिहिते बाई

मी भारूड लिहिते बाई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मी भारूड लिहिते बाई*

 

 

मी भारूड लिहिते बाई.. मला काहीच सुचत नाही

मी भारूड लिहिते बाई. मला काहीच सुचत नाही..

 

पितृपंधरवाडा आला नि गांव सारा जागा झाला

घरोघर सुरू झाली घाई, कुणी म्हणे आज जेवणार माझी आई,

तर कुणी म्हणे आज जेवणार माझी ताई…

उमरटाला फासले चंदन, लावली अगरबत्ती

हळदी कुंकू नि अक्षता माखल्या, मोठी जाव

म्हणाली, जेवायला या बरं का जाऊबाई धाकल्या..

मी आरती ओवाळली बाई…

आज जेवायला या जाऊबाई…

 

तसा त्यांच्यात माझ्यात विस्तव जात नव्हता,

उभा होता सुभासवता.. पण आता त्या राहिल्या

नाही, गेल्या निघून वरती बाई..

मला मुळीच करमत नाही तुम्ही जेवायला या जाऊबाई..,

 

मेल्यावरती ठेवू नये वैर म्हणता, बाई बाई किती

छळले ह्या दिराने, तुम्ही काय डोंबलं जाणता?

लई श्या दिल्या भाकरतुकडा दिला न्हाई..

अन् तरी तुम्ही म्हनता जेवाया बोलवा बाई..

कावळा घासच शिवला नाही. म्या दिराला बोलावलं बाई…

 

अन् ह्या सासूनं तर लई लई छळलं हो ताई,

अशा डोळ्याला लागतात धारा, नवऱ्याचा मार

नि यांचा शिव्यांचा मारा.. परनून आनंली मला

जसा काही मी गुन्हा केला..? नवऱ्याला पेटवून

ह्या फिरणार दारोदार , उद्धार करून माझा यांचा

मात्र आत्मा लई गारेगार..

 

अवं बाईच बाईची दुष्मन, दुसरे कशाला हवे?

 

आता नव्या जमान्यात म्हनताय.. पर्व सुरू झाले

आहे नवे.. बरं हाय हो बरं हाय बाबांनू, येऊ द्या

नवा कायदा कानू..

आमचं तर सरलं तुमी सुखानं ऱ्हावा ..

नका व नका आता सासूसुनांचा कावा..सुखानं

नांदा आता जावा जावा.. कशापाई करावा कुनाचा हेवादावा..

तुमी सुखाने ऱ्हावा बरं बाई.. मी भारूड लिहिते बाई.. मी भारूड लिहिते बाई मी..

भारूड लिहिते बाई…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा