रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबविली
“किल्ला स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी नव्हे तर कर्तव्य” — सहभागींचा संकल्प
देवगड :
भारतीय जनता पक्षाच्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत आज विजयदुर्ग किल्ला परिसरात मोठ्या उत्साहात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले होते.
या स्वच्छता मोहिमेत पडेल मंडलाच्या वतीने सुमारे २०० कार्यकर्त्यांसह शालेय विद्यार्थी व महिला वर्गानेही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विशेष म्हणजे किल्ला परिसरातील गवत आणि झुडपे हटवण्यासाठी तब्बल ४० गवत कापणी यंत्रांचा वापर करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात किल्ल्यावरील श्री भवानी देवीला गाऱ्हाणे घालून करण्यात आली. त्यानंतर स्वच्छतेसाठी उपस्थित कार्यकर्त्यांचे २०/२० अशा लहान-लहान पथकांत विभाजन करून किल्ल्याच्या विविध भागात साफसफाईचे काम हाती घेण्यात आले.
आजच्या स्वच्छता मोहिमेत भाजपा नेते बाळा खडपे, पडेल मंडल अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर, जिल्हा पदाधिकारी रवी पाळेकर, डॉ. अमोल तेली, अरिफ बगदादी, संजय बोंबडी, भूषण पोकळे, रामकृष्ण जुवाटकर, भूषण बोडस, अंकुश ठुकरूळ, संजना आळवे, विजयदुर्ग सरपंच रियाज काजी, पडेल सरचिटणीस रवींद्र तिर्लॉटकर, रामकृष्ण राणे आदींसह स्थानिक नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने सर्वांनी एकमुखाने व्यक्त केले की, “जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेला विजयदुर्ग किल्ला स्वच्छ व सुंदर ठेवणे ही फक्त जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.”
या उपक्रमामुळे केवळ किल्ल्याचा परिसर स्वच्छ झाला नाही तर इतिहास जपण्याची व पुढील पिढ्यांपर्यंत त्याचे संवर्धन करण्याची जाणीव नागरिकांमध्ये दृढ झाली.
