You are currently viewing जिल्ह्यात उत्साहात प्रेरणा दिवस साजरा

जिल्ह्यात उत्साहात प्रेरणा दिवस साजरा

जिल्ह्यात उत्साहात प्रेरणा दिवस साजरा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पडतेवाडी शाळेला भेट, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

  • चिमुकल्यांशी साधला संवाद
  • ‘शाळा तेथे दाखले’उपक्रमांतर्गत दाखले वितरण

सिंधुदुर्गनगरी 

  जिल्हा प्रशासन आणि शाळा यांच्यातील दुवा दृढ करण्यासोबतच विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आज ‘प्रेरणा दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. कोकण विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला असून त्यानुसार प्रत्येक अधिकाऱ्याने जिल्ह्यातील शाळांना भेट देण्याचे निर्देश देण्यात आले होते.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा परिषदेच्या कुडाळ-पडतेवाडी येथील पांडुरंगशेठ पडते विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळाली तर प्रशासनातील कामकाजाची माहिती मुलांना समजावून सांगण्यात आली. शासकीय अधिकारी कसा काम करतो, प्रशासन व विद्यार्थी यांच्यात थेट संवाद घडून येणे आणि त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणे हा या दिनामागचा उद्देश आहे, असे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले.

 ‘शाळा तिथे दाखला’ या उपक्रमास प्रतिसाद

सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या ‘शाळा तिथे दाखला’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळांमध्ये प्रशासन स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वय व अधिवास दाखले वितरित करत आहे. महसूल विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबवला जात असून, जिल्ह्यातील १०० टक्के शाळांमध्ये दाखले देऊन विद्यार्थ्यांना शासनाच्या सेवांचा थेट लाभ देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे श्रीमती धोडमिसे यांनी स्पष्ट केले.

याच उपक्रमाचा भाग म्हणून पडतेवाडी शाळेतील काही विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वय-अधिवास प्रमाणपत्रे देण्यात आली.

यावेळी प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार वीरसिंग वसावे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, नायब तहसीलदार नागेश शिंदे, अमरसिंह जाधव, मंडळ अधिकारी श्री. मसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांच्यासह शिक्षक माधवी सावंत, शुभलक्ष्मी सावंत, गीतांजली सावंत, सुविद्या चव्हाण, मिताली तळेकर, प्राची भोगटे, लक्ष्मण आगलावे, अदिती राणे, परिणी बगळे, वैष्णवी केळुसकर, वैदेही गोसावी, शिल्पा राणे, स्नेहल दळवी, मधुराराणी परब, कृष्णा गावडे, सरिता परब, तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर संवादातून आलेला आत्मविश्वास व उत्साह पाहून प्रेरणा दिनाचा खरा उद्देश साध्य झाल्याचे उपस्थितांना जाणवले.

 विविध अधिकाऱ्याच्या शाळांना भेटी

निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी कुडाळ येथील जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक  मस्जिद मोहला उर्दू शाळेला  भेट  देऊन  तेथील विद्यार्थ्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुलांना अभ्यास व इतर उपक्रमांबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेतून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.  यावेळी मुख्याध्यापक श्रीमती सारा जमीर अहमद शेख उपस्थित होत्या.

            सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळेला गट विकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी भेट दिली. तसेच त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सहभागी होऊन मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा