“दोडामार्ग तालुक्यात अमली पदार्थ विक्रीला आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांची मंत्री नितेश राणेंकडे मागणी”
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असून, या समस्येने संपूर्ण तालुक्याला विळखा घातला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी मा. नितेश राणे, कॅबिनेट मंत्री (मत्स्योद्योग व बंदरे विकास) व पालकमंत्री सिंधुदूर्ग जिल्हा यांना निवेदनाद्वारे सदर अमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नागरिकांच्या मते, सुरुवातीला गोव्याच्या सीमावर्ती गावांमध्येच गांजाची विक्री मर्यादित होती. मात्र आता संपूर्ण दोडामार्ग तालुका या धंद्याचा अड्डा बनला आहे. या भागाचा “डम्पिंग स्टेशन” म्हणून वापर केला जात असून, येथे अमली पदार्थ साठवून गोवा राज्यात पाठवले जात आहेत. विशेषतः कॉलेजमधील तरुण या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे गंभीर वास्तवही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
यापूर्वी कणकवलीमध्ये मा. नितेश राणे यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर धंद्यांवर मोठा आळा बसलेला दिसून आला. त्याच धर्तीवर दोडामार्ग तालुक्यातही गांजा व ड्रग्स विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर आणि ठोस कारवाई व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
त्यासाठी विशेषतः अमली पदार्थ विरोधी पथकाचे केंद्र दोडामार्ग तालुक्यात स्थापन करावे, अशी विनंती श्री. गणेशप्रसाद गवस, शैलेश दळवी, गोपाळ गवस, भगवान गवस, दादा देसाई व योगेश महाले यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.
“या समस्येकडे आपण व्यक्तिशः लक्ष द्या व भविष्यातील पिढीच्या रक्षणासाठी ठोस पावले उचला,” अशी आशा व अपेक्षा स्थानिक नागरिकांनी मा. नितेश राणे यांच्याकडे व्यक्त केली आहे.

