*लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीकांत धारकर लिखित अप्रतिम लेख*
*मनाच्या रानात*
मन… एक विशाल रान. विलक्षण रान आहे.. दिसायला शांत, पण आतल्या आत कितीतरी विचारांचं, भावनांचं, आठवणींचं वादळ घेऊन फिरणारं कुठे आठवणीचे वादळ .. तर कुठे मोहक फुलबाग.. कुठे काटेरी झुडप . या रानात कधी फुलं फुलतात, तर कधी काटे टोचतात. कधी एखादं जुने झाड आठवणींचं सावली देतं, तर कधी हरवलेले वाट सरण बनून समोर उभ्या ठाकतात. माणुस दिसतो तितका सरळ कधीच नसतो मुळी. त्याच्या मनाच हे रान कायमच गुढ . खोल आणि बरचस विस्कळीत असत
जगात खुप काही घडत आहे त्यात विज्ञान तंत्र दान . यश .. प्रगती .. अजून खुप काही प्रत्येकाच्या मनात काहीतरी चाललेल असत .. काळजी .. प्रश्न.. लपलेली वेदना .. ज्याचा बाजार मांडता येत नाही .. पण अस काहीतरी मनात असत ज्याच्या मुळे आयुष्याच्या प्रगतीवर आणि गतीवर परिणाम होत असतो
प्रत्येक माणसाच्या मनात एक खास कोपरा असतो — कुणालाच न दिसणारा, न समजणारा. या कोपऱ्यात त्याच्या भूतकाळाच्या छाया असतात, भविष्याची भीती असते, आणि वर्तमानाचं गूढ असतं. मनाच्या या रानात कुणीच पाहुणं होत नाही. जरी आपण लोकांमध्ये असलो, तरी आपलं खरं अस्तित्व हे मनाच्या त्या खोल गुहेतच असतं. आणि हेच मनातल रान समाजाच वास्तव दाखवत असत . कुणीच एकट राहात नाही . तरी एकट एकट वाटण्याची संख्या मात्र सतत वाढते आहे . समाजात गोंधळ वाढलेला आहे पण प्रत्यक्षात संवादाची उणीव जाणवते आहे . मुखकमलावर हसू आहे पण डोळ्यात मात्र एक प्रकारची उदासी दिसते आहे .
आजचा समाज तंत्रज्ञानाच्या प्रगतीने खूप पुढे गेला आहे. प्रत्येक गोष्ट “डिजिटल” झाली, पण मनाचं रान अजूनही “ऑनलाईन” नाही झालंय. तिथे अजूनही भावना अनसेंसरड आहेत. कुणाचं दु:ख, कुणाची भीती, कुणाचा एकटेपणा – हे सगळं या रानात गुपचूप जपून ठेवलेलं असतं. मनातली भावना .. उदासी .. एकटेपणाची भावना ही येते तरी कुठुन?
ती आपण समजून न घेतल्यामुळे .. त्याला कायम स्वरूपी एक गोष्ट नेहमीच हवी असते . ती म्हणजे ” कोणीतरी आपल ऐकाव .. समजून घ्याव .. आपल्या मनाप्रमाणे वागाव” एवढच
आपल्याला बोलायला माणसं मिळतात, पण ऐकायला फारच थोडे. म्हणूनच मनाच्या रानात उदास रात्रींना स्वतःशीच संवाद सुरू होतो. “का झालं असं?”, “माझीच चूक होती का?”, “तिने असं का केलं?”, “तो समजलाच नाही मला…” – अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं आपण तिथे शोधायचा प्रयत्न करतो.
या रानात सामाजिक भानही असतं – आपण काय करतो, त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर, मित्रांवर, समाजावर होतो. पण जेव्हा मनाचं रान कोरडं पडतं, तेव्हा अनेकांना मानसिक आजार, नैराश्य, एकटेपणाचा सामना करावा लागतो. आणि हे आजार बाहेरून कधीच दिसत नाहीत – कारण ते फक्त त्या रानातच उगम पावतात. आज किती तरी लोक मानसिक आरोग्याच्या समस्येशी झुंज देत आहेत .. किती तरी ज्येष्ठांना स्वतःच्या घरी असुन सुद्धा उपेक्षीत वाटत आहे..
कर्तव्य म्हणून प्रत्येक जण उपेक्षीत जीवन सुद्धा जगत आहेत .. हे सगळ मनाच्या रानात चाललेल एक प्रकारच युद्ध च आहे .. बाहेरून शांत .. धीर .. गंभीर परंतु आतुन मात्र खवळलेल्या समुद्रा सारख .. एका मागुन एक आवर्तन सुरूच राहतात…
म्हणूनच, आपण आपल्या आणि इतरांच्या मनाच्या रानाची काळजी घ्यायला शिकायलं हवं. कुणाला समजून घ्यायचा प्रयत्न करा, कुणाचं मन ऐका – फक्त ऐका, सल्ला न देता. मनातलं रान जर थोडं फुलवता आलं, तर त्या सुगंधाने समाजही निरोगी राहील… या रानात जर एखादा हरवला तर त्याला बाहेर काढण्यासाठी सुदृढ समाजाची साथ लागते .. एक मदतीचा .. हात.. . आधाराचा … विश्वासाचा… आपुलकीचा .. लागतो .. तो हात समजा काही कारणास्तव मिळाला नाही तर तो माणुस कधी काळच्या अंधारात हरवतो .. हे कोणालाच कळत नाही.. म्हणूनच मनाच्या राना कडे बघायलाच हव .. फक्त स्वतःच्या नव्हे तर इतरांच्या सुद्धा .. इतरांचही कुणाच मन रानात भटकतय का हे बघण्याची संवेदनशिलता नक्कीच असायला हवी .. आपल्या मना सोबत इतरांच्याही मनातली वादळ समजून घ्यायची आपली मनापासुनची तयारी असायला हवी..
आज गरज आहे ती सहवेदनेची, संवादाची आणि समजूतदारपणाची. कारण मनाचं रान ही फक्त वैयक्तिक गोष्ट नाही, ती एक सामाजिक जबाबदारी आहे… कारण समाज ही केवळ मजल्यावर मजले चढणारी इमारतीची रचना नव्हे.. ती माणसाच्या मनाची जुळवा जुळव असते… जेव्हा इतरांच्या मनात डोकावतो .. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण माणुस होण्याच्या राजमार्गावर वाटचाल करतो .. प्रत्येकान प्रत्येकाच्या मनात थांबायला हवं.. तेव्हाच सहवेदनेची आणि माणुसकीची पालवी फुटायला खरच वेळ लागणार नाही … मनात खुप मोठी प्रचंड .. महाकाय अशी शक्ती असते .. शक्तीचा स्रोत मनात असतो … मनाने घेतल तर काही ही अशक्य नाही …
श्रीकांत धारकर
बुलडाणा
