You are currently viewing आई… आणि… बाई…

आई… आणि… बाई…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आई… आणि… बाई….*

 

सकाळी उठते पहाटे उठते अंगण झाडते बाई

सडा टाकते रांगोळीही रोज काढते बाई

शेण काढते गोठा झाडते गाय पाजते बाई

आंजारते नि गोंजारते दूधही काढते बाई…

 

वासरू पाजते खुंटी बांधते दोर लावते बाई

अंगण आवरून घाई घाई घरात जाते बाई

पाणी तापवून पोरेबाळे न्हाऊ घालते आई

भांग पाडूनी तेल लावूनी डबा ही देते आई…

 

आधण ठेवते चहा पाजते साऱ्यांना मग आई

भाकरी बडवते साऱ्यांसाठी भाजी बनवते आई

कपडे भिजवते नदीवर मग पाटी भरूनी नेते

खसाखसा ती कपडे धुवूनी दमून घरी येते…

 

भराभरा ती आवरून सारे कामावरती जाई

शेत असो वा असू दे ॲाफिस कधीच ना कुचराई

येता येता घरचे वेध भाजी काय करू बाई

लोकलमध्येच भाजी निवडते आई ती घाई घाई..

 

घरात पाय दारात पाय जुंपून घेते बाई

कपभर चहा करून कुणीही हातावर ठेवत नाही

तिच करते चहा खायला देते काहीबाही

साहेब मात्र पेपर वाचत कॅाटवर लोळत राही..

 

हे सारे रात्रंदिवस करत असते आई

ती हे सारे करते.. हे सुद्धा लक्षात येत नाही

तिच्याचसाठी माणुसकी का आटते कळत नाही

इतके करून ती दमत असेल? कुणाला कदर नाही…

 

वळकटी जाते सरणावर तोवर बोलत नाही

तिला पक्के माहित असते, बोलून उपयोग नाही

बंद ओठ सरणावरती होतात शेवटी खुले

“खूप चांगली होती हो म्हणतात…”

. …… . जेव्हा तिला ऐकू येत नाही……

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा