१८ सप्टेंबर रोजी रेहमान इन्स्टिट्यूट, नवी मुंबईची टीम करणार मार्गदर्शन
दहावी, अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, करिअर संधी व प्रशिक्षणाची सविस्तर माहिती
मालवण :
मालवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधींबाबत मार्गदर्शन मिळावे या हेतूने रेहमान इन्स्टिट्यूट, नवी मुंबई यांची टीम मालवण येथे गुरुवार दि. १८ सप्टेंबर रोजी मर्चंट नेव्हीवर मोफत मार्गदर्शन शिबिर घेणार आहे. सकाळी ८ वाजता, स. का. पाटील महाविद्यालय तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सकाळी १० वा. कट्टा येथील वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये ही शिबिरे होणार आहेत.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे माजी अध्यक्ष आशीष पेडणेकर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मार्फत मागील दोन वर्षांत अशाच विद्यार्थी मार्गदर्शनाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आले होते. त्याचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी यशस्वीपणे मर्चंट नेव्हीमध्ये दाखल झाले आहेत. याच धर्तीवर यावर्षीदेखील हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात विद्यार्थ्यांना मर्चंट नेव्ही म्हणजे काय?, प्रवेशासाठी आवश्यक पात्रता व प्रशिक्षण प्रक्रिया, प्रशिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी, महासागरावर मोठ्या जहाजांवरील राहणीमान, मर्चंट नेव्हीमुळे जगभर प्रवास करण्याची संधी या विषयांवर माहिती दिली जाणार आहे. मार्गदर्शनासाठी कॅप्टन मकरंद सरदेसाई (फॅकल्टी – बी.एससी. नॉटिकल सायन्स), श्री. अभिनव देशमुख (कॉम्प्युटर सायन्स), श्री. प्रमोद म्हात्रे (प्लेसमेंट ऑफिसर) आणि कु. नियती पाटील उपस्थित राहणार आहेत. हे मार्गदर्शन व प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे.
तरी दहावी, अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे गव्हर्नर कौन्सिल सदस्य श्री. विजय केनवडेकर यांनी केले आहे.

