सावंतवाडी:
निरामय विकास केंद्र कोलगाव या संस्थेच्या वतीने होतकरू हुशार अशा ग्रामीण भागातील ७२ विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षाकरिता ४ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. जे विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत ज्यांना अकरावी व पुढील वर्गातील शिक्षण घेण्यासाठी शुल्क भरणे शक्य नसते अशा होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी, आयटीआय तसेच बारावीनंतर अन्य कोर्सला प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांना १००००/- पर्यंत आर्थिक मदत करण्यात आली आहे.
गेली अनेक वर्ष निरामय विकास केंद्राच्या वतीने शैक्षणिक मदत केली जाते. या वर्षात दहा शाळांना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी प्रत्येकी ₹१००००/- देण्यात आले होते. तसेच या संस्थेच्या वतीने आरोग्यासाठी सुद्धा मदत केली जाते. ज्या रुग्णांना साहित्य घेणे शक्य नसते अशांसाठी बेड, व्हील खुर्ची देखील संस्थेकडे मोफत वापरा व परत करा तत्वावर उपलब्ध आहेत. या शैक्षणिक वर्षात इ. अकरावीत शिक्षण घेत असलेल्या आतापर्यंत ४२ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली. या धनादेशाचे वाटप सदस्य श्री.भरत गावडे व ॲड.सौ. सुषमा राऊत धुरी यांनी केले.

