*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट: ३१*
*पितर*
पितृपंधरवडा चालू होता. काकल्या रोज कुणाकडे तरी म्हाळाचे जेवत होता. सकाळी थोडसं काम करायचा आणि दुपारी कोणाकडे तरी वडाप मारायचा. संध्याकाळी परत आणखीन कोणाकडे जेवायला जायचा. हा कामकर्ता माणूस पण अलिकडे आळसावला होता. आमच्या घरी आला की, मी त्याला टोकायचो. ‘रोज रोज दोन-दोन वेळा कसली वडपा मारतोस?’ असं विचारायचो. त्यावर ‘लोकांची रागेणी काडूची लागता रे.’ असं म्हणायचा. अनेक गोष्टीत खुसपटं काढणारा काकल्या जेवायला मात्र सगळीकडे जाई. संध्याकाळच्या वेळेत माझ्याकडे येऊन मग तर्कटं लढवत बसे.
कालही आलेला. मला म्हणाला, ” पितरांका इतक्या महत्त्व कित्याक रे?”
“अरे, आपल्या गेलेल्या वाडवडीलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा म्हाळ हा एक चांगला मार्ग आहे.” मी म्हणालो.
“पून ही शिश्टीम घातली कोनी?” काकल्या तर्कट लढवू लागला.
“कुणास ठावूक? पण आपल्या पूर्वीच्या जाणत्या लोकानी हे केलं असावं. त्यात मग हळूहळू बदल होत जातात. पितर, देव अशा सूक्ष्माचा वेध घेण्याची त्याना आस असावी?” मी थोडं स्पष्ट केलं.
“सूक्ष्माचो शोध घेवचो, तर स्थूलातला जेवाण कित्याक?” काकल्याच्या तोंडी असं वाक्य ऐकून मी चमकलो. तोही हसला. ” काय रे, स्थूल-सूक्ष्म काय तुयाचा बोलाचा? सूक्ष्माचा शोध सूक्ष्मात्सूनच घेया मरे.” काकल्या अजून चकीत करीत राहिला. “अरे, कोऱ्या कागदावर लिहिण्याआधी आखीव कागदावर सराव करावा लागतो ना? तसंच हे. प्रवास हा स्थूलातूनच सूक्ष्माकडे होत असतो.” मी सांगत राहिलो.
“बऽरा. इतक्या वर्सात आपल्या आवाठातलो कोन सूक्ष्माकडे पोचलो काय? आवाठातलो जाव, गावातलो? नायतर तुझ्या कुळातलो? कोन पोचलोहा, तर आठवन ठेय. फाल्या येतय.” कुत्सित हसत काकल्या चालू पडला.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802
