*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*पितृपक्ष– पितृपंधरवडा*
गणपती विसर्जनानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरु होतो हे आपल्याला माहितच आहे.
प्राचीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत. सातवाहन राजांनी शालिवाहन शक सुरू केले. ते चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होते. त्यामुळे हिंदू नववर्ष चैत्र पाडव्याला सुरू केले जाते. मात्रं महालय हा काळ बदलला गेला नाही. तो भाद्रपदाचा दुसरा आठवडाच राहिला. ती प्रथा शतकानुशतके जोपासली गेली आहे
भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. यांस ” महालय” असेही नाव आहे.
पितृपक्षाचा काळ भाद्रप्रद वद्य प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावस्ये पर्यंत असतो…
पितृपक्षाला पितृपंधरवडा, पित्तरपाट, श्राद्धपक्ष, हडपक्ष, पित्रीपोखो, सोळाश्राद्ध पक्ष, कणागत, जतीया, महालय पक्ष आणि अपारा पक्ष अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.
या पर्वाचे वैशिष्टय़ म्हणजे सूर्याचे संक्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे होते.
आपल्या पूर्वजांच्या नावे श्राद्ध करून पितरं जेवायला घातले म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते हा यामागील समज आहे.
हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वर प्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण. ही चार ऋण फेडणे हे होय. देवांना यज्ञ भाग देवून देव ऋण फेडता येते तर ऋषी मुनी संत यांच्या विचारांना आदर्शांना आत्मसात करत त्यांचा प्रचार-
प्रसार करत त्यानुसार जीवन घडवून ऋषी ॠण फेडता येते. तर पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. श्राद्धविधी हा हिंदुधर्माचा अविभाज्य भाग आहे व धर्मशास्त्रात श्राद्ध हे गृहस्थाश्रमी लोकांना कर्तव्य म्हणून सांगितले आहे.
भारतीय संस्कृतीचं एक मोठं वैशिष्ट्य आहे की विविध संस्कारांद्वारे धर्मपालनाद्वारे मानवाला समृद्ध बनविलं जातं आणि मृत्यूनंतरही त्याचं स्मरण केलं जातं. ही स्मरणाची परंपरा पिढयानपिढया जपली जाते.
आणि जपलीही आहे.
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा श्राद्ध पक्षाच्या रूपाने साजरा केला जातो. श्राद्धाचा महिमा व विधीचे वर्णन विष्णू, वायू, वराह, मत्स्य आदी पुराणांमध्ये तसेच महाभारत मनुस्मृती शास्रमध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळते… धर्मशास्त्रावरील निरनिराळ्या ग्रंथात श्राद्धाच्या व्याख्या दिल्या आहेत. त्या अश्या – ब्रह्मपुराणात म्हटले आहे की पितराना उद्देशून (त्यांच्या हिताकरिता) जे जे काही योग्य काळी, योग्य स्थळी, सत्पात्र व्यक्तींना आणि ब्राह्मणांना धर्मशास्त्रात सांगितलेल्या विधीला अनुसरून श्रद्धापूर्वक देण्यात येते त्याला श्राद्ध म्हणतात.
याज्ञवल्क्याने म्हटले आहे की पितर म्हणजे श्राद्धामध्ये देवता असणारे वसू, रुद्र, आणि आदित्य श्राद्धाच्या योगाने संतुष्ट होऊन मनुष्याच्या पूर्वजांना संतोष देतात.
मृतात्मे याच दिवसांत पुन्हा पृथ्वीवर अवतरतात असा समज आहे. वैज्ञानिक जगतात याबाबत ब-याच वेळा काथ्याकुट होतो. मात्रं पूर्वजांच्या स्मृती जपण्याचा कसोशीने प्रयत्न करताना पूर्वजांची आदरयुक्त भीती असावी असा प्रयत्न ही परंपरा निर्माण करताना झाली असावी.असे मला वाटते..
विविध श्राद्धांच्या निमित्ताने विविध दाने देण्यासही आपल्या संस्कृतीने महत्त्व दिले आहे. अध्ययन- अध्यापन व पौरोहित्य यावर चरितार्थ अवलंबून असणाऱ्या गरजू ब्राह्मणांना उपयुक्त ठरतील अशी दाने दिली जात. कोरडा शिधा, वस्त्र, छत्री,चपला, बिछाना, पाण्याचा घडा, दिवा अशीही दाने आहेत. याच जोडीला श्राद्धाच्या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांला शालेय वस्तू देणे, ब्राह्मणाला ग्रंथ देणे, वृक्षारोपण, जलाशय बांधणे, अनाथ मुलांचे संगोपन, प्राण्यांचे रक्षण करणे अशी समाज व पर्यावरणाला उपयुक्त दाने ही पुराण ग्रंथांनी सांगून ठेवली आहेत. त्यांचे प्रत्यक्ष उपयोजन आधुनिक काळात करणे आवश्यक आहे असे मी मनापासून नमूद करीन.
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
