सावंतवाडी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी येथील भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी फिरता डिजिटल दवाखाना या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील लोकांना या दवाखान्याअंतर्गत शंभर पेक्षा जास्त तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे पाच ते दहा मिनिटात तपासणीचे अहवाल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात सेवा पंधरवडा साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर १७ सप्टेंबरला सावंतवाडीत ‘डिजिटल फिरता दवाखाना’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाची प्रेरणा पंतप्रधान मोदींना गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळातून मिळाली असल्याचे परब यांनी सांगितले. ‘राष्ट्रहित सर्वोपरि’ हा मंत्र मोदींनी १४० कोटी भारतीयांना दिला आहे व त्यांच्या “मै देश को झुकने नहीं दूंगा” या निर्धारातून विकसित भारताची संकल्पना साकार होत असल्याचे मत श्री. परब यांनी व्यक्त केले.
डिजिटल फिरता दवाखाना अंतर्गत १०० हून अधिक आरोग्य तपासण्या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. यामध्ये हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर ई.सी.जी., रक्तदाब युरिन टेस्ट, वजन, उंची, बॉडी मास इंडेक्स आणि हाडांची ठिसुळता यासारख्या तपासण्यांचा समावेश आहे.

