*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्वत:शी संवाद*
रोज वाटतं,
कुणीतरी विचारावं —
“तू खरंच ठीक आहेस ना?”
पण आवाज बाहेरून यायची गरज नसते,
तो आतल्या आतच ऐकू येतो,
कधी कुजबुजून,
कधी ओरडून.,कधी हसून
आरशात पाहताना
चेहरा ओळखीचा वाटतो,
पण डोळ्यांच्या पलीकडचं काहीसं धुसर…
ते शोधताना
मी मलाच हरवत जाते.
काही आठवणींना शब्द लागतात,
तर काही फक्त उसासे होऊन
मनाच्या कोपऱ्यात बसतात.
कधी हसणंही नकळत ओझं वाटतं,
कारण त्यामागे लपलेली वेदना
फार काळजीपूर्वक झाकलेली असते.
कधीकधी वाटतं ,
हा एकांतही एक संवादच असतो,
तुटक, बेचैन करणारा ,
कधी निखळ, प्रांजळ
पण अगदी खराखुरा.
जो सांगतो —
“तू असशील जरी एकटी,
तरी एकटी नाहीस…
तू स्वतःबरोबर आहेस.!”
*©️®️ डॉ मानसी पाटील*

