‘अॅग्रीस्टॅक’ साठी दोडामार्ग तहसील सभागृहात विशेष शिबीर सुरू
शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन
दोडामार्ग
डिजिटल इंडियाच्या युगात आता शेती क्षेत्रातही क्रांती घडत आहे. ‘अॅग्रीस्टॅक’ या अभिनव प्रणालीमुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असून पारदर्शक कारभारालाही चालना मिळणार आहे. यासाठी दोडामार्ग तहसील सभागृहात १० ते १२ सप्टेंबर दरम्यान विशेष शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी दिली.
अॅग्रीस्टॅक ही एक अशी प्रणाली आहे, जी शेतकऱ्यांना एक ‘युनिक फार्मर आयडी’ प्रदान करते. या आयडीमुळे शेतकऱ्यांची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात एकत्रित केली जाते आणि त्यांना एक वेगळी ओळख मिळते. यामुळे सरकारी योजनांचा लाभ मिळवणे अत्यंत सोपे आणि जलद होते. शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचे अनुदान आणि लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. यामुळे मध्यस्थांची गरज संपुष्टात येईल. पीक कर्ज, विमा, खते आणि बियाणे मिळवण्यासाठीची प्रक्रिया अधिक सोपी होईल. शेतकऱ्यांना डिजिटल स्वरूपात ओळख मिळाल्याने योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल.
फार्मर आयडी तयार करण्यासाठी आधार कार्ड, सातबारा उतारा किंवा आठ-अ उतारा, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे. याबाबतची नोंदणी महा-ई सेवा केंद्र, सेतू कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, ग्राम महसूल अधिकारी कार्यालय येथे करता येते. तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी केले आहे.

