You are currently viewing वर्तमान शिक्षणातील प्रासंगिकता

वर्तमान शिक्षणातील प्रासंगिकता

*के. रा. कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवलीचे प्रा. श्री. प्रशांत पुंडलिक शिरुडे लिखित अप्रतिम लेख*

 

*वर्तमान शिक्षणातील प्रासंगिकता*

 

*’आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना’.*

खरंतर केवळ असं म्हणून नाही चालत. प्रत्येक मुलाच्या विकासात त्याचे शिक्षक, आई-वडील, आजूबाजूचे शैक्षणिक, सामाजिक वातावरण या सर्वांचा परिणाम होतोच. एक शिक्षक या नात्याने मूल कसे घडते यावर टाकलेला हा एक दृष्टीक्षेप.

महात्मा गांधी म्हणत, “शिक्षण म्हणजे शरीर, मन, बुद्धी या त्रयींचा विकास”.

मुलांचा विकास हा निरीक्षणाने सर्वात जास्त होतो. प्रत्येक गोष्ट मूल बघते, अनुभवते आणि त्यातून शिकते. अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत मूल हे शिक्षकांकडून जितके शिकते त्याहून जास्त आपल्या मित्रांकडून शिकते. म्हणूनच जीवनात चांगल्या मित्रांची गरज असते.

खरंतर आपलं म्हणजे शिक्षकाचे किंवा पालकाचे काम हे मुलांना समस्या देणं, यातून मुले समस्येचा सामना करण्यात सक्षम बनतात. समस्येचे उत्तर शोधून त्यावर मात करणे शिकतात. अर्थात समस्या दिल्यानंतर त्यावर मूल कशा प्रकारे मात करतात याकडे लक्ष देणे नितांत आवश्यक आहे. तसे नाही केले तर कदाचित नवीन समस्या उद्भवू शकतात. शालेय जीवनातच मुलं नियमितपणा, शिस्त, नीटनेटकेपणा यासारख्या अनेक गोष्टी शिकतात व आत्मसात करतात. किशोर अवस्था सुरू होण्यापूर्वीच मुले चांगलं बोलायला, वाचायला व लिहायला शिकलेली असतात. किमान त्यांना या गोष्टी तोपर्यंत आल्याच पाहिजेत.

मानवी जीवनात किशोर अवस्था हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. मानवी जीवनातील ही खऱ्या अर्थाने वादळी वर्ष असतात. या कालखंडात मुलांचा झपाट्याने शारीरिक, बौद्धिक, मानसिक बदल व विकास होत असतो. या कालखंडात विद्यार्थ्यांना अधिकाधिक उपक्रमशील बनवता येते. शालेय जीवनात विविध स्पर्धांमध्ये जसे चित्रकला, हस्ताक्षर, निबंध, वक्तृत्व, नाटक, विज्ञान प्रदर्शन, स्नेहसंमेलन, खेळ, विविध शालेय कार्यक्रम व उपक्रम यात विद्यार्थी जितके जास्त कृतीयुक्त सहभागी राहतील तितका त्यांचा विकास चांगला होतो. जे आहे त्याचा स्वीकार करत आपलं उद्दिष्ट, ध्येय, स्वप्न पूर्ण करण्यास मुले तयार होतात. याच कालखंडात आई, वडील आणि शिक्षक म्हणून आपल्याला आवश्यक तेथे मुलाचा कान धरता आला पाहिजे आणि योग्य वेळी त्याचं बोटही सोडता आलं पाहिजे. अर्थात हे करताना कुठेही मुलांच्या ‘स्व’ ला धक्का लागता कामा नये.

मुलांमध्ये चिकाटी आणि चिवटपणा हे गुण उपजत असतात, पण या कालखंडात त्याचा अधिक विकास करता येऊ शकतो. याच कालखंडात मुलांना त्यांचे आई-वडील करत असलेल्या कष्टांची व त्यांच्या स्वप्नांची व इच्छा आकांक्षांची जाणीव करून देता येऊ शकते. नाही करून दिली तर याचे विपरीत परिणाम सुद्धा होतात. वर्तमान कालखंडात मुले टीव्ही, इंटरनेट, त्यावरील गेम्स, फेसबुक, इंस्टाग्राम, मोबाईल चॅटिंग यांच्या गरजे पेक्षा जास्त आहारी जाण्याची शक्यता असते. हे सुद्धा एक व्यसनच आहे. त्याचा अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणाम दिसल्याशिवाय राहत नाही.

माती पासून सुंदर आणि टणक मडकी बनवणारा कुंभार, दगडापासून सुंदर मूर्ती घडवणारा शिल्पकार, सोन्यापासून सुंदर दागिने बनवणारा सोनार, सुंदर चित्र रेखाटणारा चित्रकार, सुंदर वास्तू बनवणारा स्थापत्यकार ज्याप्रमाणे आपल्या कडील साहित्याच्या साहाय्याने सुंदर कलाकृती निर्माण करतो त्याप्रमाणे शिक्षकालाही मुलांना घडवायचे असते. या कामी मुलाचे आई-वडील, समाज व इतर संसाधने यांचा योग्य उपयोग व ताळमेळ साधता येणे, हे खरे शिक्षकाचे कौशल्य असते.

येथे महाभारत युद्धातील कर्णाची एकाग्रता भंग करणाऱ्या शल्यापेक्षा अर्जुनाला आपल्या कर्माची (कर्तव्याची) आठवण करून देणाऱ्या कृष्णाची भूमिका शिक्षकाला पार पाडायची असते. ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’ या हिंदी उक्तीप्रमाणे प्रत्येक काम वेळेत करण्याची सवय लागणे महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांनी व पालकांनी स्वतःचे टाईम टेबल बनविणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी जर टाईम टेबल बनवले तर मुलांना त्यातून शिकता येईल. खेळ, शाळा, क्लास, अभ्यास, मनोरंजन या सर्वांसाठी वेळ निश्चित करता येईल. ‘Be happy and make others happy’ या इंग्रजी उक्तीप्रमाणे स्वतः आनंदी राहणे व इतरांनाही आनंदाने जीवन जगण्यास मदत करणे. हेही शिकवता येईल.

खरंतर व्यक्तीचे बिघडणे आणि सुधारणे हे त्याच्या विचारांवर व स्वभावावर अवलंबून असते म्हणून तर रामाच्या राज्यात कैकयी आणि रावणाच्या राज्यात बिभीषण तयार झाले पण म्हणून आपण प्रयत्न सोडून चालणार नाही. कदाचित विचारांची दिशा बदलली तर भविष्यातील दशा बदलायला फार वेळ लागणार नाही. जीवन जगताना कधी कधी माघार सुद्धा घ्यावी लागते. ती यशस्वी घेता येणे हे सुद्धा एक कौशल्य आहे.

लघुते पासून सुरुवात करणे, नाविन्याचा स्वीकार करणे, निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणे, रोज आपण नवीन काय शिकलो याची स्वतःकडे लेखी नोंद ठेवणे. आपण या जगात कशासाठी आलो याचा विचार करून आपण कोणतेही काम का करतो हे जर समजले तर स्वतःच्या जीवनातील ध्येय, उद्दिष्ट साध्य होण्यास नक्कीच मदत होते. म्हणूनच तर थॉमस एडिसन चा 999 वेळा केलेला प्रयत्न चुकला पण तो ध्येयापासून विचलित झाला नाही व जगाला प्रकाश देणाऱ्या बल्प चा निर्माता ठरला.

आजच्या विद्यार्थ्याला यश हे संघर्ष करून किंवा कष्ट करून मिळवणे माहित नाही कारण वर्तमान कालखंडात पालक त्याला त्याच्या अपेक्षेपेक्षा आणि स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त सुख सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात. अर्थात हे करतांना पालक त्यांच्या लहानपणी ज्या प्रकारच्या सुखापासून वंचित होते, असे त्यांना वाटते, ते सर्व त्यांच्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतात. परिणामी येणारी पिढी ही चटकन प्रलोभनाला बळी पडताना दिसते. त्यांना त्यांच्या क्षमता व मर्यादा याची जाणीव होत नाही.

ज्याप्रमाणे कावळ्याने कोकिळेसारखं गायक व्हायचं ठरवलं किंवा कोंबड्याने घारीसारखं उंच उडायचं ठरवलं तर ते शक्य नाही त्याप्रमाणे पालकांनी सुद्धा मुलांकडून आवाजावी अपेक्षा बाळगणे योग्य नाही.निसर्गाने प्रत्येकाला क्षमता आणि गुण भिन्न भिन्न दिलेले असतात

मित्रांनो ‘शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते’ या उक्तीप्रमाणे रिकाम्या वेळेत काम केले तर चांगले यश मिळू शकते. निवडलेल्या किंवा स्वीकारलेल्या कामात प्राविण्य प्राप्त करणे हेच खरे यशाचे गमक असते.

शेवटी काय झटपट यश मिळत नसते. मिळाल्यासारखे वाटले तरी टिकत नसते,रोज सातत्याने योग्य दिशेने मेहनत व परिश्रम केले तर आणि तरच आपण अंतिम व योग्य यशापर्यंत पोहोचू शकतो. हे कदापी विसरता कामा नये.

 

धन्यवाद.

लेखक

प्रा. श्री. प्रशांत पुंडलिक शिरुडे

के. रा. कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली.

9967817876

prashantshirude1674@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा