*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पूर्वज*
एक कावळा रोज येतो
कठवड्यावर बसून कावकाव करतो
दहीभाताची उंडी मस्त खातो
नि मग आनंदाने उडून जातो
जणू त्याचं माझं जन्मोजन्मीचं नातं कुणाकुणाचे अंश जाणवतात त्याच्या अस्तित्वात
खरं म्हणजे तो येतो आणि जातो
जाताना मायेचे शब्द ठेवून देतो
ती नसते कर्कश्श कावकाव फक्त
एक संवाद असतो मनातला आर्त
काय चाललंय माझ्या जीवनात आता
चढउतारांच्या असंख्य क्षणात तोच वाटतो त्राता
माय बाप आजी आजोबा विलीन झाले अनंतात
पण रोज येणाऱ्या या काकपक्ष्याच्या रूपात
जणू काही माझे पूर्वजच मला भेटायला येतात…
*राधिका भांडारकर*
