१३ सप्टेंबरला चिमणी पाखर डान्स अकॅडमीचा भव्य नृत्याविष्कार
कुडाळ :
चिमणी पाखर डान्स अकॅडमी, कुडाळ प्रस्तुत आणि उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका… नृत्याचा सुरेख प्रवास’ हा भव्य कार्यक्रम शनिवारी, १३ सप्टेंबर रोजी कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. ‘तारका’ या कार्यक्रमाचा हा पहिलाच शो असून तो सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सुंदरी फेम सेलिब्रिटी नृत्यांगना दीक्षा नाईक हिच्यासह तब्बल १४ नृत्यकलाकारांचा संच सलग दोन तास सादरीकरण करणार आहे. या संकल्पनेचे सल्लागार सुनील भोगटे असून नृत्यदिग्दर्शन रवी कुडाळकर यांचे आहे.
या निमित्ताने पत्रकार परिषदेत सल्लागार सुनील भोगटे आणि अध्यक्ष रवी कुडाळकर यांनी माहिती दिली. त्यांच्या समवेत तारकाचे निर्माते उमेश पाटील, सौ.स्वाती पाटील, सौ.वेदिका सावंत, सेलिब्रिटी नृत्यांगना दीक्षा नाईक, निखिल कुडाळकर, तन्मय आईर तसेच सर्व कलाकार उपस्थित होते.
चिमणी पाखर अकॅडमीने यावर्षी २१ वे वर्ष पूर्ण केले असून त्यानिमित्त हा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे. विविध प्रकारच्या नृत्याविष्कारांनी सजलेला हा कार्यक्रम नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या दोन तासांच्या भव्य कार्यक्रमात दीक्षा नाईक, संजना पवार, साक्षी परब, सिमरन नायर, दुर्वा परब, विश्राया धामापूरकर, तनिषा नाईक, सलोनी सावंत, अंतरा ठाकूर, प्राची जाधव, युक्ती हळदणकर, चिन्मयी सावंत, निधी केळुसकर, प्राची पाटकर व निरिल कुडाळकर या नृत्यांगनांचा सहभाग आहे.
यावेळी ‘तारका’ या डान्स शोचे आणि मोफत प्रवेशिकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी सर्व कलाकारही उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

