डाक अदालतीचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई यांच्या कार्यालयामध्ये 132 वी डाक अदालत दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी सायं. 4 वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी दिली आहे.
देशामधील पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करून प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करते. ही सेवा देताना, संभाषणामध्ये /पत्र व्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटींमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात कि त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात.
पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींचे या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट काउंटर सेवा, डाक वस्तु पार्सल, बचत बैंक व मनिऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्यांचे नाव व हुद्दा इत्यादी. संबंधितानी डाक सेवेबाबतची तक्रार मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जीपीओ बिल्डींग, जीपीओ कॉम्पलेक्स पहिला माळा, मुंबई 400001 यांचे नावे दोन प्रतींसह दिनांक 19 सप्टेंबर 2025 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.

