*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा कोमसाप मालवण सदस्या लेखिका कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम लेख*
*वर्षासहल*
हिरवाईने नटलेला निसर्ग…..
डोंगररांगातून रिमझिम बरसणाऱ्या श्रावण सरी …..
या श्रावण सरींना अंगावर झेलत आपल्या सख्यांसोबत मुक्तपणे फुलपाखरासारखे बागडणे ही कल्पनाच मनाला उभारी आणते . ही कल्पना जेव्हा प्रत्यक्षात साकारते तेव्हा ते मन धुंद होऊन जातं . विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडासह जेव्हा पहिला पाऊस बरसतो , त्या पावसाच्या धारा अंगावर झेलताना बेभान होऊन मोर रानात थुई थुई नाचतो . अगदी तसंच हे मन वर्षा सहलीचा आनंद मिळणार या जाणीवेने थुई थुई नाचत वाऱ्यावर डौलाने डोलत होतं…..
प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी कुडाळ शाखेची वर्षा सहल रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी कांद्यात आली .या सहली एकूण३५ महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.
प्रत्येक सखीने रोजचा संसार , नोकरी , प्रपंच व त्यातील जबाबदाऱ्या कर्तव्य व चिंता या सर्व गोष्टी एका गाठोड्यात गच्च बांधून घरी ठेवल्या. प्रत्येक जण आनंद मौजमजा व मस्ती ही वस्त्रे परिधान करून गाडीत चढल्या .शिक्षक समिती महिला आघाडी अध्यक्ष संजना पेडणेकर . सचिव गंधा अणावकर तसेच खजिनदार साधना सूर्यवंशी मॅडम यांच्या उत्कृष्ट अशा नियोजन आयोजन व धडाडीच्या नेतृत्वाखाली सर्व मैत्रिणी दिवसभर सह्याद्रीच्या डोंगररांगातून निसर्गाचा आस्वाद घेत हिंडत होत्या . सहलीतील प्रत्येक क्षण हा आनंद देणारा होता . जशी मधमाशी मधाचा एक एक थेंब आपल्या पोळ्यात साठवते अगदी तसाच प्रत्येक क्षण प्रत्येक सखी आपल्या हृदयाच्या कप्प्यात साठवत होती . आनंदाच्या त्या डोहात मुक्तपणे डुंबत होती.
गोड गळ्याच्या गायिका रश्मी वालावलकर मॅडम यांनी आपल्या सुमधुर आवाजात श्री गणेशाचे स्तवन म्हटले . व सर्वांना मंत्रमुग्ध केले . या गीतातील भक्तीचा गोडवा चाखताना प्रत्येकामध्ये चैतन्य निर्माण झाले.गाण्याच्या भेंड्या खेळताना प्रत्येकीने त्यात सहभाग घेतला .
*स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं ह्यो कोकण*
*तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होताला मन*
हे गीत अभिमानाने गात सर्व मैत्रिणींनी त्यावर ठेका धरला. हिंदी , मराठी , कोकणी अशी कितीतरी गाणी सर्वच मैत्रिणी उत्साहाने गात होत्या .
*गाना आये या ना आये गाना चाहिए* असे मिश्किलपणे गात स्वतःच स्वतःच्या पाठीवर शाबासकीची थाप देत होत्या.साधना सूर्यवंशी व सुजाता मॅडम सुंदर नृत्य करत होत्या . सर्वांना सहभागी करून घेत होत्या .तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षिका पल्लवी साईल वेगवेगळी नवनवीन गाणी मोबाईलवर लावत सर्वांना नाचण्यासाठी गाण्यासाठी प्रेरणा देत होत्या.
महाराष्ट्राची लोककला लावणी नृत्य ….. आदिती मसुरकर यांची स्वरचित लावणे रश्मी वालांकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात सादर केली. टाळ्यांच्या गजरात सर्वांनी या लावणीचे कौतुक केले. चंद्रा या लावणीवर किरण सावंत मॅडमनी केलेले नृत्य पाहून सर्वांनी तोंडात बोटे घातली . त्याच वेळी अचानक स्फुरण येऊन नवोदित शिक्षिका यांनी केलेल्या अप्रतिम लावणी नृत्याने सर्वांचे डोळे दिपून गेले .
वर्षा सहलीतील सर्वांची लाडकी छोटी जुईली पांढरा शुभ्र फ्रॉक घालून बसमध्ये फुलपाखरासारखी इकडून तिकडे बागडत होती. गुलाबी साडी . नथिने मारली मिठी अशा नवनवीन गाण्यांची फर्माईश करत होती .तिला या सर्व महिलांचे आपल्या दीदी वाटत होत्या सर्वांची ती एकरूप झाली होती आनंदाने नाचत होती …. बागडत होती… गात होती हसत होती…
वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधबा… तेथील काचेचे पूल ,नैसर्गिक सृष्टी सौंदर्य… खळखळून वाहणारी नदी.. मोठमोठे काळेभोर खडक, हिरवीगार वनराई सारे काही नजरेला सुखद अनुभव देणारे होते…..
आपल्याच विश्वात प्रत्येक जण या सौंदर्याचा आस्वाद घेत होते. येथील सुंदर दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात सर्वजणी गुंतल्या होत्या. हळूहळू सह्याद्रीच्या डोंगररांगातून वळणे घेत आमची गाडी गगनबावड्याच्या मठाकडे निघाली. गाडीच्या खिडकीतून दिसणारे निसर्गाचे अलौकिक रूप पाहताना डोळे दिपून गेले.
स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण या ओळीची प्रत्यक्ष साक्ष देणारे ते कोकणचे अवर्णनीय असे सौंदर्य होते ….मऊ मऊ कापसाचे पांढरे शुभ्र पुंजके हिरव्यागार डोंगरात पकडापकडीचा खेळ खेळत होते . उंच उंच डोंगरावर व खोल खोल दरीत गच्च पानांनी लगडलेले वृक्ष दाटीवाटीने उभे होते .या उंच उंच डोंगरावरून नदीबाई दगड धोंड्यातून , कडेकपारीतून वाट काढत धबधब्याच्या रूपाने ठिक ठिकाणी कोसळत होती .शुभ्र हिऱ्यासारखे चकाकणारे धबधब्याचे तेजस्वी रूप अंगावर शहारा आणत होते .
गगनगिरी च्या पायथ्याशी गाडी थांबली सर्व मैत्रिणींचा मोर्चा गगनगिरी महाराज यांच्या मठाच्या दिशेने वळला हळूहळू पायऱ्या चढत सर्वांनी श्री दत्त महाराज व गगनगिरी महाराजांचे भक्ती भावाने दर्शन घेतले तेथील गार हवेची झोप अंगावर घे डोंगरात खडकावर साकार झालेल्या गणपती बाप्पांचे दर्शन घेत सर्व मैत्रिणी परतीच्या प्रवासाला लागल्या. दुपार झाली होती. सर्वांच्या पोटात कावळे ओरडत होते. सर्वांना ओढ लागली होती सुग्रास भोजनाची व आकर्षण बिंदू असणाऱ्या सावडाव धबधब्याची……
सावडाव धबधब्याकडे आगमन होताच सर्वांनी ताजेतावाने होत भोजनाचा आस्वाद घेतला. थोडावेळ फोटो काढण्यात घालवला. तदनंतर सर्वजणी सावडाव धबधब्याचा मुक्त आनंद लुटण्यासाठी पाण्यात उतरल्या . उंचावरून वेगाने कोसळणाऱ्या पाण्याचा प्रवाह अंगावर झेलत सर्वजणी निर्मळ जलात मनसोक्त डुंबल्या . पाण्याचा मारा पाठीवर झेलताना असं वाटत होतं की धबधबा दादा आपल्या या लाडक्या बहिणींना धपाटे देत आहे. शुभ्रकाचे सारखे पाण्याचे तुषार सर्वांगाला चिंब भिजवत होत्या. बहिणीच्या मनातील ताणतणावाचा मळ आपल्या जलाशयाने हा धबधबा मोठ्या भावाच्या मायेने स्वच्छ करत होता. विसाव्यासाठी आलेल्या या भगिनींवर आनंदाचे सिंचन करत होता.
प्रत्येक जण लहान मूल बनून येरे येरे पावसा . …. डराँव डराँव बेडका…. अशी बडबडगीते ,बालगीते म्हणत आनंदाचे तुषार एकमेकांवर उधळत फेर धरून नाचत होत्या. मासोळी बनून जलाशयी पोहत होत्या. छोटी जुईली तर थबकल घालून पाण्यात बसली होती . गार गार पाण्याने शहारत होती. कधी बेडूक उडया मारत होती. तर मध्ये पाण्यात डुबकी मारत चमकणाऱ्या माशासारखी पोहत होती. यातून तिला मिळणारा आनंद तिच्या प्रत्येक कृतीतून जाणवत होता. ….
प्रत्येक जण सुर्वे मॅडमच्या या सुंदर गोजिरवाण्या फुलपाखराला अलगद सांभाळत होत्या. त्या फुलपाखरा सोबत स्वतःही पाण्यात डुंबत होत्या….
प्रत्येक सखी आपलं वय विसरून मुक्तपणे या वर्षा सहलीचा आनंद मनमुरादपणे लुटत होती….
*क्षण हा सौख्याचा…..*
*क्षण हा आनंदाचा……*
*मौजमजा मस्तीचा….*
*मुक्तपणे जगण्याचा….*.
*स्वतःमध्ये डोकावण्याचा….*
*स्वतःला शोधण्याचा…..*
*निसर्गाच्या सानिध्यात*
*स्वतःला हरवून जाण्याचा…..*
नोकरी, संसार-प्रपंच सांभाळताना, जबाबदारीचे डोंगर सर करताना प्रत्येक महिलेच्या मनावर, मेंदूवर आलेल्या चिंतेचे मळभ पळवून लावण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी या वर्षा सहलीने केली. वर्षा सहलीचे आयोजन करणाऱ्या, त्यात सहभागी होणाऱ्या व आनंदाचे दान आमच्या पदरात घालणाऱ्या सर्व महिला भगिनी व सखींना मनःपूर्वक धन्यवाद!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*✒️© सौ. आदिती धोंडी मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

