मा. अध्यक्ष मनिष दळवी यांची ग्वाही
आंबोलीत ऊस पिक परिसंवाद; शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे यांचे मार्गदर्शन, शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती
आंबोली :
आंबोली, चौकुळ, सावंतवाडी व दोडामार्ग या भागामध्ये ऊस उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून यासाठी लागणारे सर्व प्रकारचे आर्थिक साहाय्य आणि पाठबळ सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निश्चितपणे देईल, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनिष दळवी यांनी दिली.
अथर्व इंटरट्रेड प्रा. लि., कोल्हापूर लिज्ड युनिट, दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हलकर्णी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा व ऊस पिक परिसंवाद सोमवार दि. ०८ सप्टेंबर रोजी दुपारी २.०० वाजता आंबोली ग्रामपंचायत हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथील माजी शास्त्रज्ञ मा. श्री. आबासाहेब साळुंखे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ऊस शेतीचे महत्त्व, आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादन वाढविण्याच्या पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी ऊस शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्याबरोबरच या भागातील साखर उद्योगाला चालना मिळू शकते, असे स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी बोलताना, “सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिली आहे. ऊस उत्पादन हा आपल्या जिल्ह्यासाठी नवीन व महत्त्वाचा उपक्रम ठरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लागणारी आर्थिक मदत, कर्ज सुविधा व आवश्यक ते सर्व पाठबळ बँक देण्यास कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन केले.
या मेळाव्याला जिल्हा बँकेचे संचालक सर्वश्री गजानन गावडे, रवींद्र मडगांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे, अथर्व-दौलत साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजय मराठे, संचालक श्री. विजय पाटील यांची उपस्थिती होती. तसेच आंबोली व चौकुळ पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऊस शेतीसाठी नवे मार्ग खुलणार असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत होईल, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
