सावंतवाडी:
ऐतिहासिक शहर अशी ओळख असणाऱ्या सावंतवाडी शहरात अकरा दिवसांच्या श्री गणेशाला ढोल ताशांच्या गजरात “गणपती बाप्पा मोरया…पुढल्या वर्षी लवकर या” अशी भावूक हाक देत निरोप देण्यात आला. यावेळी मोती तलावाच्या काठावर ओसंडून वाहणारी गर्दी दिसून आली. विशेष करून श्रीराम वाचन मंदिर परिसर गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. तीन मुशीजवळ, हॉटेल पाँपस समोरील गणेश घाट आणि श्रीराम वाचन मंदिर समोर श्रीगणेशाचे विसर्जन सुरू होते.
सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर समोरील गणेश घाटावर एकामागोमाग एक अशा अनेक घरगुती आणि सार्वजनिक गणेशांचे आगमन होत होते, आरतींचे सूर आसमंतात निनादत होते अन् जड अंतःकरणाने प्रत्येकजण आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत होता. अती उत्साही गणेश भक्तांकडून फटाक्यांची आतषबाजी होत होती तर काही मिरवणुकांमध्ये लेझीम, ढोल ताशे आदी पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी देखील शिस्तीत गणेशमूर्तींचे बोटींच्या सहाय्याने तलावात विसर्जन केले. पोलिस बांधवांनी देखील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवत चोख बंदोबस्त ठेवला होता. एकूणच श्री गणेश विसर्जनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सावंतवाडी शहर भक्तिरसात पार न्हाऊन गेल्याचे दिसून आले.
