*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सुखकर्ता दु:खहर्ता बाप्पा…*
सर्वसमावेशक रूप तुझे देवा
रूपागुणांचा तू आहे खरा ठेवा
तुला पाहताच मन प्रसन्न ते
मनातील मलीन पळूनच जाते…
रडकाही होतो क्षणात हासरा
अबबब! तुझा केवढा पसारा
आयुधे ही सारी गण सोबतीला
रूणझुण नाचतो किती तुझ्या लीला..
बाळरूप तुझे फारच मोहक
तसा तू नाहीच कधीच दाहक
मिष्किल ते डोळे बघ बोलतात
मी आहे सोबती जणू सांगतात..
सामावून सारे पोटात तू घेतो
फोलपटे सुपाने उडवून लावतो
बारीक डोळ्यांनी निरखतो सारे
तुझा अंगसंग प्रसन्नता भरे…
हाक मारता तू धावत रे येतो
दु:ख्खेच सारी पळवून लावतो
तुझ्या सामर्थ्याच्या माहित रे कथा
जागोजागी दिसे तुझी महानता…
अडचण मग असो कोणतीही
देवगण येती जातीने तुझ्या गेही
आम्ही सामान्य रे तरी तू पावतो
सर्वांना समान भेद न ठेवतो..
आदर्श तुझा तो सांग किती घ्यावा
मनुष्य जन्मच उद्धरून जावा
प्रत्येकच कृती तुझी अनमोल
म्हणून पिटतो आम्ही तुझे ढोल..
नीतीची प्रेरणा दे फक्त माणसा
गोड फळे येती मग त्या कणसा
तुझे गुण गाता मी न आवरते
मनात नित्यच तुला मी स्मरते..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

