You are currently viewing करुळ घाटात दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत…

करुळ घाटात दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत…

करुळ घाटात दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत…

वैभववाडी

गेले काही दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. ही घटना आज सकाळी ८ च्या सुमारास घडली. यामुळे परतीच्या प्रवासाला निघालेल्या अनेक चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे. या दरड कोसळण्याच्या घटनेमुळे रस्त्याचा सुमारे ५० फूट भाग माती आणि मोठ्या दगडांनी व्यापला गेला आहे. सध्या दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र मोठ्या दगडांमुळे आणि दाट धुक्यामुळे यात अडथळे येत आहेत.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा मार्ग पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी सायंकाळपर्यंत वेळ लागण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे, पोलिसांच्या सूचनेनुसार या मार्गावरील वाहतूक भुईबावडा व फोंडाघाट मार्गे वळवण्यात आली आहे. वाहनचालकांना आणि प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे करुळ घाटात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाकडून जेसीबी मशीनच्या साहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू असून, मोठ्या दगडांना फोडण्यासाठी ब्रेकरचा वापर केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा