*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आमच्या घरचा गणपती…*
आमच्या घरचा गणपती छान
सारेच देती त्याला हो मान
सुपासारखे त्याचे हो कान
देखणा सुंदर त्याचीच शान…
मोठाले डोळे करून बघतो
प्रसाद कोणताही चालतो
नाव त्याचे नि आम्हीच खातो
गंमत आमुची बघत राहतो..
मिष्किल त्याचे डोळ्यात भाव
सारेच विश्व त्याचे हो गाव
कसा नि किती त्याचा प्रभाव
हाक मारता घेतो तो धाव…
नारळ खोवून मोदक केले
नैवेद्य म्हणून त्यास दाविले
क्षणात चट्टामट्टा ते झाले
खुदूखुदू गणराज हासले…
कैलासावरी चालती लीला
तुरूतुरू चाले गण साथीला
उंदिरमामाच्या चालती लीला
रामायणही लिहू लागला…
संकटमोचन महान आहे
आमच्या घरात लहान राहे
लक्ष ठेवूनी सारे तो पाहे
जगात साऱ्या वाहवा आहे…
आनंदे करतो पुजन रोज
रोज निराळा असतो भोग
त्याच्याच मिषे आमुची मज्जा
उगाच नाव तुझे रे राजा..
घरात तुझा मोठा दिलासा
सर्वांना वाटे हवाहवासा
कृपाशीर्वादे निर्भय होतो
गुणगाण तुझे नित्यच गातो…
प्रा. सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
