कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर जसे दिसले तसे
माझे जिवलग मित्र व सध्या पुण्याला स्थायिक झालेले प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांचा मला फोन आला. ते म्हणाले माझे साहित्यिक मित्र व पुणे विद्यापीठात कार्यरत असणारे डॉ.अविनाश आवलगांवकर तुमच्या अमरावतीला येत आहेत. रिद्धपूर येथे स्थापन झालेल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी त्यांची निवड झाली आहे. तू आठवणीने त्यांची भेट घे.
मित्राचा आग्रह आणि तोही जिवलग मित्राचा . त्यानुसार मी कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांना भेटावयास गेलो. तसे त्यांचे नाव मी पूर्वीपासून ऐकून होतो. त्यांचे लेखन कार्य त्यांची सभा संमेलने तसेच ते महानुभाव पंथांचे कार्य तन-मनधनाने करीत असल्याचे सदैव स्मरणात होते. आणि सर्वात महत्त्वाचे की ते आमच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात काटी या गावचे राहणारे आहेत.
खरं म्हणजे कुलगुरू म्हणून रुजू होण्यापूर्वी त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत. अनेक ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. त्यांच्या हाताखाली पीएचडी झालेल्या मुलांची संख्या ही लांबलचक आहे. यांतील एम.फिल. करणारे विद्यार्थी तर त्याहीपेक्षा जास्त आहेत. हा माणूस लोकाभिमुख आहे. समाजाभिमुख आहे .म्हणून याचा सामाजिक प्रपंचही तेवढाच मोठा आहे. अनेक विद्यापीठात त्यांची पुस्तके अभ्यासक्रमात लागली आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग सारख्या शीर्षस्थ संस्थांची त्यांचा निकटचा संबंध आहे.
त्यांच्या आयुष्यातील बराचसा कालखंड हा पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये गेला. मराठी विभाग प्रमुख अधिष्ठाता मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवित ते सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिवही राहिले आहेत.
डॉ अविनाश आवलगावकर यांच्या जीवन प्रवासावर नजर टाकली तर आमच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड सारख्या लहानशा तालुक्यातील काटी गावच्या या माणसाने उंच भरारी घेतली आहे असे जाणवते. साहित्य आणि महानुभाव साहित्य हे त्यांच्या साहित्य विश्वातील केंद्रस्थानी असलेले श्रद्धास्थान आहे. खरं म्हणजे तन-मन घनाने साहित्याला वाहून घेणे जरा अवघडच काम असते. पण या माणसाचा मराठी साहित्यावर महानुभाव साहित्यावर जीव जडला आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने जेव्हा अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील महानुभावाची काशी असलेल्या रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करायचे ठरविले तेव्हा त्यांच्यासमोर नाव आले ते डॉ. अविनाश आवलगावकर यांचेच. विशेष म्हणजे त्यांच्या नावाला कुठेही विरोध झाला नाही .इतके त्यांचे साहित्यिक व महानुभाव पंथाचे साहित्य संदर्भातील कार्य आहे .
तुम्ही त्यांना भेटलात तर एक ज्येष्ठ मित्र आपल्याला भेटला आहे असा भास होतो. कुठेही बडेजाव पण नाही .साधी राणी आणि उच्च विचारसरणी हा बाणा त्यांच्यामध्ये तंतोतंत उतरला आहे. माझे मित्र प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांचा त्यांचा घरोबा आहे .त्यामुळे चवरेसर आले की कुलगुरू डॉ.अविनाश आवलगावकरकडेच उतरतात. आमच्या भेटीगाठी होतात. साहित्यांवर व साहित्यिक चळवळींवर चर्चा होते आणि त्यामध्ये वेळ कसा निघून जातो ते कळतही नाही.
परवा रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमासाठी भारताचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांना निमंत्रित करायचे होते. आवलगावकरसरांचा मला फोन आला. गवई परिवाराची माझी जवळीक त्यांना माहीत होती. ते म्हणाले या कामी माझी कमलताई गवई मॅडमशी भेटायची इच्छा आहे. त्याप्रमाणे मी सरांना घेऊन अमरावतीच्या काँग्रेसनगर मधील न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांच्या निवासस्थानी गेलो. नेहमीप्रमाणे मातोश्री लेडी गव्हर्नर डॉ.कमलताई गवई यांनी आवलगावकर सरांचे मनापासून स्वागत केले.
आवलगावसर रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठात येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी विद्यापीठाला गतिमान करण्याचे मोठे कार्य केले आहे आणि अजूनही करीत आहेत. खरं म्हणजे पुणे मुंबईचे अधिकारी व उच्चपदस्थ अमरावतीकडे यायला मागेपुढे पाहतात. पण या माणसाने पुणे सोडून रिद्धपूरला आपले कार्यक्षेत्र मानून श्री गोविंद प्रभू व श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली आहे आणि ती महत्त्वाची आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेगळ्या परीक्षा समित्यांवर ते आहेत. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची लेखांची समीक्षांची यादी जशी लांबलचक आहेत तशी त्यांनी राष्ट्रीय स्तरावर राज्यस्तरावर विद्यापीठ स्तरावर घेतलेल्या शैक्षणिक उपक्रमांची यादी देखील प्रचंड आहे. असा हा प्रचंड व्यक्तिमत्त्वाचा साधासुधा माणूस आमच्या मराठी भाषा विद्यापीठाला कुलगुरू म्हणून लाभला आणि खऱ्या अर्थाने विद्यापीठ हे लोकाभिमुख जनताभिमुख व्हायला आता सुरुवात झाली आहे. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर या गावाचे नाव ते महाराष्ट्रातच नव्हे भारताच्या नकाशावर सन्मानाने व कर्तृत्वाने पोहोचतील याची शाश्वती आहे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
