*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*—माझे शिक्षक –*
आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो.
त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला तर भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्हीही पदे भूषविली असली तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली म्हणूनचं त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून ओळखला जाऊ लागला…
आपले व्यक्तिमत्त्व घडविणा-या शिक्षकांची ओळख शाळेच्या पहिल्या पायरीवर अगदी अजाणत्या वयात होते. तेव्हापासूनच आपण बाई, गुरूजी, सर, मॅडम, अशा विविध नात्यांनी आपण त्यांना संबोधतो.. शिक्षक आपल्याला योग्य तेच शिकवण्याकरिता प्रयत्न करीत असतात यातूनच संस्कार, शिक्षण आणि ध्येय घडत असते. स्वप्नं बघण्याकरिता व हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनीच तर मार्गदर्शन केलेले असते आणि आपल्याला एक आदर्श ओळख देण्याचे काम करणा-या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा संस्मरणीय असा हा दिवस…
भारतीय संस्कृतीत शिक्षकांचं स्थान नेहमीच मानाचं मानलं गेलं आहे…
शिक्षणातील विविधरंगी अनुभवांना आणि ते घेण्यासाठी केलेल्या भटकंतीला मी ‘परिक्रमा’ म्हणते.. मला ही शिक्षणातील भटकंती नर्मदा परिक्रमेसारखी वाटते. शिक्षण रूपी नर्मदेची परिक्रमा करताना विद्यार्थी रूपी भाविक नर्मदेला काही देत नाही तर शिक्षणरूपी नर्मदाच भाविकाला समृद्ध करते. शिक्षणक्षेत्रातच्या भटकंतीत तर मला शिक्षणानेच समृद्ध केले आहे. नर्मदेसारखाचं शिक्षणाचा प्रवाह शतकानुशतके वाहतो आहे. त्या अर्थाने दोन्हीत खूप साम्य आहे. नर्मदेच्या काठाने फिरताना महानगरे लागतात आणि अगदी छोटा आदिवासी पाडाही लागतो. सुंदर वाटा लागतात आणि डोंगर-दऱ्याही लागतात. शिक्षण रूपी परिक्रमा करतानाही मला शिक्षणाचे वेगवेगळे स्तर बघता आले. इंटरनॅशनल स्कूलपासून
आश्रमशाळेपर्यंत शिक्षणाची विविध रूपे पाहता आली. शिक्षणातला ‘भारत’ आणि ‘इंडिया’ अनुभवता आला.
माझ्या हायस्कूलच्या वटवृक्षाच्या सावलीस आलेली मी एक छोटाशी पक्षीण.. आज निरोप घेण्यास उभी आहे. इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची अवस्था ही सासरी जाणाऱ्या नववधूप्रमाणे झालेली आहे. प्रत्येकाची शरीरे जरी इथे असली तरी मने मात्रं जुन्या स्मृतींना जागे करण्यात गुंग झालेली आहेत..
खरंच ..! किती अविस्मरणीय होता तो प्रवास…! याच शाळेत पाचव्या इयत्तेत माझ्यासारख्या मातीच्या गोळयाचे आगमन झाले. आणि या मातीच्या गोळयाला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षेरूपी दिव्यात तावून सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनीच…
पाचवीपासून जशी माझी शारिरीक उंची वाढली तशी मानसिक उंचीही वाढली. माझ्या गुरूजनांनी फक्त अभ्यासातील विषयांशीच माझी मैत्री जमवली नाही तर जगात कसे वागायचे कसे जगायचे हे देखील शिकवले. अवघ्या काही वर्षातच माझ्या या सुरवंटांचे रूपांतर फुलपाखरात झाले.
सुरवंटांचे झाले
पाखरू
सर्वत्र लागले
भराऱ्या मारू
नवे जग नवी आशा
शोध घेण्याची जबर
मनिषा
याच शाळेने लावले
वळण
त्यावर चढू लागली
यशाची चढण.. !!
हे वळण लावण्यासाठी शिक्षकांनी अविरत कष्ट घेतले. शिक्षकांनी आमच्या अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा, संस्कृतीचा लेप दिला. मनाच्या कोऱ्या करकरीत पाटीवर समतेचे, ममतेचे धडे गिरविले. आणि आज ती पाटी ज्ञानरत्नांनी शिगोशिग भरली..
शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज म्हणूनच माझ्या जीवनाचे होकायंत्र होण्यासाठी त्यांनी प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला. हे सर्व करताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोलले नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्या रूपी दगडातील देव शोधून त्यांच्यावर सद्वविचारांचे घाव घातले आणि त्या दगडाला ज्याच्या त्याच्या गुणवैशिष्टयाप्रमाणे देवाचे रूप दिले. उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्या लेखनाच्या मुर्तीला आकार मिळाला आणि मी लेखिका कवयित्री निवेदिका झाली..
शिक्षकांनी फक्त हुशार विद्यार्थीच निर्माण केले नाहीत तर उत्कृष्ट कलाकार व उत्तमोत्तम खेळाडूही निर्माण केले. आजही माझ्या मनात रूंजी घालत आहेत ती शाळेतील व्याख्याने, नाटयवाचने, एकांकिका बसवणे, प्रदर्शनाचे तक्ते, वक्तृत्व स्पर्धा ते सत्कार इतकेचं काय.. माझ्यासाठी सर्व शक्तीपणाला लावणारे माझे गुरूजन… ते जिंकणे.…ते हरणे…!
माझ्या व्यक्तीमत्वाला पैलू पडले ते इथेच.. काहीचं घडण ….. काहीचं बिघडणं…सारंच निरूपद्रवी आणि सर्वांत शेवटी तथास्तु म्हणून दिलेला आदर्श विद्यार्थीरूपी आशिर्वाद.. !
शिक्षक दिनी तर मुख्याध्यापक होताना अवघ्या तीन साडेतीन तासात शिक्षकांचे कष्ट, त्यांचे प्रयत्न लक्षात आले आणि म्हणूनच ठरवलं की सागरात पोहण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या माझ्या शिक्षकांची आभार मानण्याची आजची ही संधी !!
नव्या क्षितिजांना साद घालताना जुन्या क्षितीजांना अभिवादन करणे, त्यांचे आशिर्वाद घेणे हीच आपली संस्कृती. म्हणूनच या संस्कृतीचा पाईक असणारी मी स्मृतीची फुले मनात साठवत मी माझ्यासाठी झटणाऱ्या सर्व शिक्षकांना, कर्मचा-यांना शतश: अभिवादन करते..
माझ्या व्यक्तीमत्वाचं रोप छोटया कुंडीतून मोठया जमिनीत रूजवलं ते माझ्या शिक्षकांनी आणि म्हणूनच मी म्हणेन ” तेथे कर माझे जुळती”
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी— ठाणे @
9870451020
