You are currently viewing “सिंधुदुर्गच्या समुद्रात परराज्यांच्या अनधिकृत नौकांवर कारवाई तेजीत; ‘शीतल’ गस्ती नौकेची नियुक्ती”

“सिंधुदुर्गच्या समुद्रात परराज्यांच्या अनधिकृत नौकांवर कारवाई तेजीत; ‘शीतल’ गस्ती नौकेची नियुक्ती”

“सिंधुदुर्गच्या समुद्रात परराज्यांच्या अनधिकृत नौकांवर कारवाई तेजीत; ‘शीतल’ गस्ती नौकेची नियुक्ती”

मालवण

सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासळीची चोरी करणाऱ्या परराज्यांतील अनधिकृत नौकांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या स्पष्ट निर्देशानुसार मत्स्यव्यवसाय विभाग पूर्ण तयारीत आहे, अशी माहिती विभागाचे सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत गोवा आणि कर्नाटक ही राज्ये असून, या राज्यांतील काही मासेमारी नौका वारंवार महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत शिरून मासळीची लूट करतात. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि त्यातील २०२१ मधील सुधारणा प्रभावीपणे राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या कारवाईसाठी ‘शीतल’ ही गस्ती नौका ११ ऑगस्टपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असून, नियमित गस्तीद्वारे कारवाई सुरू आहे. गेल्या वर्षीही अशा घुसखोरी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात आली होती, आणि यंदा नव्या हंगामाच्या सुरुवातीलाच ही मोहिम पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

सध्या पावसाळी व वादळी हवामानामुळे समुद्रात गस्त घालण्यात काही अडचणी येत आहेत. हवामान विभागाने १ ते ५ सप्टेंबर दरम्यान समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. मात्र, हवामान स्थिर होताच गस्ती नौका आणि ड्रोनच्या साहाय्याने कठोर कारवाई करण्यात येईल, असेही कुवेसकर यांनी स्पष्ट केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा