*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट:२९*
*मुंबयकार*
पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले होते. काकल्या मोकळा झाला होता. जवळपास आठवड्याने तो आमच्या घरी आला. “काय रे, मुंबयकार गेलो?” आल्याआल्याच काकल्याने प्रश्न टाकला.
“हां, बंधुराज काल निघाले.” मी सांगितले.
“काय हाताक लायल्यान का नाय?”काकल्या पुढे सरकला.
मी हसलो. हास्याचे अनेक प्रकार आणि फायदे आहेत. प्रश्न टाळणे हा त्यातलाच एक फायदा.
“हसतंस सो? काय तरी हातात लायला आसतला.”
” हो, पाच हजार देऊन गेला. तुझाही भाऊ आलेला ना?”
” होय. चौथी दिसा इलो. काजू मोदकाचा पाकिट आनी उदवातीचो पुडो घेवन् इल्ललो. गणपतीक इतके धडपडान हे येतत तरी कित्याक, काय समजाना?” काकल्या वैतागत म्हणाला.
“अरे,भावना असतात. एवढ्या लांबून गणपतीसाठी धडपडत आवर्जून येतात,हे काय कमी आहे? ” मी समजावले.
“धडपडत येतत ह्या मान्य. पून गणपतीक येतत ह्या काय पटना नाय. भक्ती तर मुळीच नाय. अरे अष्टमीक येवचा, घर झाडूचा ,पोरसू साफ करुचा;तर आमचो भावाशी महापरसादाक इलो आनी पाचय दिस खिशात काय हात घालूक नाय.” काकल्या अजून स्पष्ट करत होता.
“सगळेच असे काही वागत नसतात. आपण वेगळ्या दृष्टीने बघायचं. गणपती येतो, सगळे लोक भेटतात. चांगलं वातावरण असतं. आनंदाची उधळण असते, भजनाची हौस भागते; म्हणून लोक येतात. मुंबयवाला जो येतो, तो स्वतः खर्च करून अडचणी सोसत येतो.” मी माझी बाजू मांडत राहिलो.
“पून घराचो कोनवासो मोडलो, तो बघणा नाय. तलाठ्याकडे जावन सातबारो मात्र बघून जाता. कोकण वाचवक् होया हून फेसबुकार सांगता आनी पडीक जमीन इकून टाकया हून माका सांगता. अरे, देवधरम आमी करतो तरी भिरंडाचो हिशेब मागता.” काकल्या तडतडत होता. त्याचे तर्कट पूर्णपणे चुकीचेही म्हणता येत नव्हते, तसेच सरसकट मुंबईकराना एकाच तराजूत तोलता येत नव्हते. तरीही मी आपल्या परीने समजावत राहिलो. गावात राहून मुंबईकरांची बाजू मांडत राहिलो.
कोकण विदारक अवस्थेत आहे. थेअरी आणि प्रॅक्टिकल मधील तफावत आम्ही अनुभवत आहोत. स्वार्थाकडे वेगाने चाललेल्या समाजाला बघत आहोत. उपाय एकच आहे. मन विशाल करून समजूतदारपणे जगणे,हाच उपाय आहे. तसे मी काकल्याला म्हटलेही.
पण तो तडकत राहिला, “मेल्ला मन विशाल करतलंस कसा?” असे म्हणत चरफडत राहिला. निघताना म्हणाला,” अंत समोर दिसताहा,तरी खेकाच अंत नसता असा समजान चलतहय.” उठला, पिळवटलेलं काळीज फाटक्या देहात लपवीत तो चालू पडला.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802
