प्रशासनातील दीपस्तंभ
खऱ्या अर्थाने पुरुषोत्तम डॉ.पुरुषोत्तम भापकर
माझ्या पाहणीत अनेक असे सनदी अधिकारी आहेत ती जे तन-मन-धनाने दीनदु:खी लोकांसाठी सतत काम करीत असतात .त्यापैकी एका सनदी अधिकाऱ्याचे नाव आहे पुरुषोत्तम भापकर. साहेब मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील सासवड गावचे राहणारे.
ते अमरावतीला जिल्हाधिकारी म्हणून आले तो दिवस. त्यापूर्वीचे जिल्हाधिकारी श्री रवींद्र जाधव हे माझे जिवलग मित्र. श्री रवींद्र जाधव यांची बदली झाली असे कळले आणि मी त्यांना भेटायला गेलो तर तिथे डॉ. पुरुषोत्तम भापकर नवीन जिल्हाधिकारी म्हणून रुजू व्हायला आले होते. श्री रवींद्र जाधव हे माझे जिवलग मित्र असल्यामुळे त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बसवून ठेवले. रवींद्र जाधव साहेबांनी श्री पुरुषोत्तम भापकर यांना जिल्हाधिकारी पदाचा चार दिला तो माझ्यासमोरच. माझी पुरुषोत्तम भापकर यांना ओळख करून देताना रवींद्र जाधव साहेब म्हणाले हा माणूस लष्कराच्या भाकरी भाजणारा आहे. मी यांना मदत केली आहे तुम्ही पण तुमच्या परीने सर्वतोपरी मदत करा.
डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचा पहिला परिचय झाला तो असा. पुढे तो वाढत गेला. साहेब बदली होऊन गेले .सेवानिवृत्त झाले तरी आमचे बोलणे घरी येणे जाणे सुरू आहे. जिल्हाधिकारी पदाचा पोशाख केव्हाच गळून पडला आहे. आणि मित्रत्वाचा नवीन पोशाख केव्हा तयार झाला ते आम्हाला कळलेच नाही.
भापकर साहेबांची माझी घनिष्ठ मैत्री होण्याची दोन-तीन कारणे आहेत .पहिले कारण म्हणजे त्यांची मुलगी आयएएसची तयारी करीत होती .दुसरे कारण म्हणजे त्यांना लिहिण्याची कविता करण्याची साहित्यिकांना जवळ करण्याची खूप आवड होती. तिसरं म्हणजे ते खऱ्या अर्थाने श्री संत गाडगेबाबा यांचे भक्त होते. भापकर साहेबांच्या काळात श्री संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जेवढे अमरावती जिल्ह्यात राबविण्यात आले तेवढे कोणत्याही जिल्हाधिकारी सेवेत असताना राबविण्यात आले नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा.
भापकर साहेबांची कार्यालयीन वेळ ठरलेली असायची. ते कधीही एक मिनिटही उशीर आले नाहीत .जाण्याची वेळ मात्र निश्चित नसायची. कधी कधी तर मध्यरात्र व्हायची.आल्या आल्या साहेबांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हाती झाडू घेतला. साहेबांनी घेतल्यामुळे इतरांना घेणे भाग आले आणि सर्वात पहिल्या दिवशी साहेबांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा पूर्ण परिसर झाडून काढला. मग जिल्हा परिषद मग नगरपालिका मग तालुके. गाडगे महाराजांचा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरण्यासाठी त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली आणि ते अमरावतीला असताना त्यांनी ती पाळली.
श्री पुरुषोत्तम भापकर यांचा मला एक दिवस फोन आला. ते म्हणाले उपराष्ट्रपती आपल्या अमरावती शहरात येत आहेत. त्यांना गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज यांचे इंग्रजी चरित्र पाहिजे आहे. तुमच्याकडे आहे का ? मी त्यांना म्हटले की अशा प्रकारचे चरित्र लिहिल्या गेले आहे हे काही मला आठवत नाही. ते म्हणाले मग तुम्ही लिहा. मी मदत करतो .मी माझे मित्र प्राध्यापक शरद गुजरकर यांना मदतीला घेतले आणि तातडीने श्री संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर दोन पुस्तके लिहून घेतली आणि उपराष्ट्रपतींना ते रवानाही केले.
साहेबांनी अमरावतीकरांना भरभरून प्रेम दिले. ते सकाळी कार्यालयात आल्यानंतर पूर्ण कलेक्टर ऑफिसच्या दालनामध्ये फिरवून यायचे. किती लोक आलेले आहेत. उशिरा आलेला लोकांना ते प्रेमाने समजावून सांगायचे. प्रसंगी कडकही बोलायचे. काही प्रसंगी नोटीस पण द्यायचे. आपल्या कार्यालयात येणाऱ्या माणूस हा वेळेवर आला पाहिजे लोकांची कामे झाली पाहिजेत हा त्या मागचा उद्देश होता.
आता समृद्धीमार्गामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना पाचपटस किंमत मिळाली. पण त्यांनी डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांचे आभार मानले पाहिजेत .हा पाच पट किमतीचा शुभारंभ हा डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी केला. त्याचे असे झाले की अमरावती जिल्ह्यात एक धरण बांधणे सुरू होते .त्या धरणात येणाऱ्या जमिनी लोक द्यायला तयार नव्हते .
भापकरसाहेब रात्रभर त्यांच्याशी उपोषण मंडपात चर्चा करीत बसले .त्यांचे म्हणणे असे होते की आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत .पण आम्हाला जास्त भाव पाहिजे .किती पाहिजे .तर त्यांची अपेक्षा पाचपटीची दिसली. साहेबांनी ही बाब मंत्रांना सांगितली. मंत्री म्हणाले तुमचा काय विचार आहे ? भापकर साहेब म्हणाले साहेब आपल्याकडे निधी आहे .आपण पाचपट रक्कम यांना देऊ शकतो. झाले मंत्र्यांनी हिरवी झेंडी दिली. भापकर साहेबांनी सगळी आपली यंत्रणा कामाला लावली आणि त्यांना रक्कम मिळवून दिली. जी शेतकरी मंडळी भापकर साहेबांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसली होती ती साहेबांचे आभार मानायला त्यांच्या कार्यालयात आली. याला म्हणतात अधिकारी.
भापकर साहेब अमरावती वरून औरंगाबादला महानगरपालिका आयुक्त म्हणून गेले .त्यांनी माझा मी आयएएस अधिकारी होणारच हा कार्यक्रम संभाजीनगरच्या सुप्रसिद्ध अशा एकनाथ नाट्यगृहात ठेवला .विशेष म्हणजे साहेब पूर्णवेळ या कार्यक्रमाला रसिकांमध्ये बसून प्रतिसाद देत होते. माझ्यासाठी त्यांनी एवढा वेळ काढला होता
साहेबांचे कार्य कौशल्य कार्य कर्तृत्व अफाट आहे. त्यांच्यावर चित्रपट निघाला आहे. त्यांनी गाणी लिहिली आहेत.त्याच्या कॅसेट निघाल्या आहेत. पुस्तके तर त्यांच्या नावावर भरपूर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं हा माणूस श्री संत गाडगेबाबा यांचा वसा चालवणारा आहे
परवा मी संभाजीनगरला गेलो. साहेबांना फोन केला. साहेब म्हणाले या मी घरीच आहे. मी माझे मित्र व अमरावतीचे माजी विभागीय सहनिबंधक श्री के.ई. हरिदास यांना सोबत घेतले. साहेबांचे घर गाठले .चर्चा झाली. अल्पोपहार झाला. साहेबांनी मला आमच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख आय.ए.एस. अकादमीसाठी काही पुस्तके दिली. निरोपला साहेब आम्हाला मेन रोडपर्यंत सोडायला आले .आम्ही गाडी आणली नव्हती आणि आम्हाला ऑटोरिक्षा मिळेपर्यंत ते रस्त्यावर थांबले. एक जिल्हाधिकारी एक विभागीय आयुक्त एक सचिव म्हणून राहिलेला सनदी अधिकारी आम्हाला रोड पर्यंत सोडायला येतो आणि ऑटो येईपर्यंत आमची संगत देतो ही खरोखरच महत्त्वाची बाब मला वाटली.
साहेब भेटले म्हणजे आमच्या चर्चा ज्या होतात त्या साहित्यावर होतात .शेतीवर होतात .कवितेवर होतात. राजकारण सहसा आमच्या बोलण्यात निघत नाही. मी साहेबांचे खूप कौतुक करतो की सेवानिवृत्त झाल्यानंतर ते शेतीमध्ये रमले आहेत .शेतीकडे लक्ष द्यायला लागले आहेत .शेतीतून भरघोस उत्पन्न काढायला लागलेले आहेत .शेतीवर ते आईसारखे प्रेम करायला लागलेले आहेत .त्यांचे सालवडगाव. त्यांच्याकडे घेतलेले जेवण आणि गावाच्या सीमेपर्यंत साहेब आयुक्त असताना देखील मला सोडायला आले होते हे मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही .
साहेबांनी ज्या ज्या विभागात काम केले त्या त्या विभागात ते मैलाचा दगड ठरलेले आहेत आणि म्हणूनच आज साहेब सेवानिवृत्त जरी झाले असले तरी ते ज्या ज्या जिल्ह्यात काम करून गेले त्या त्या गावातील लोक त्यांना विसरलेले नाहीत आणि विसरणारे नाहीत.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प
9890967003
