You are currently viewing कवितेच्या माध्यमातून होत आहे समाजप्रबोधन

कवितेच्या माध्यमातून होत आहे समाजप्रबोधन

कवितेच्या माध्यमातून होत आहे समाजप्रबोधन

वक्रतुंड गणेश मंडळ आयोजित प्रबोधनात्मक काव्य मैफिलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – दिनांक 30 रोजी गणेशोत्सवानिमित्त वक्रतुंड गणेश मित्र मंडळ, शिवाजीनगर आयोजित प्रबोधनात्मक काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. गणेश उत्सव म्हणजे समाज जागृती आणि समाज एका छताखाली आणण्याचा उत्सव होय. या उत्सवाचे औचित्य साधून वक्रतुंड गणेश मित्र मंडळाने एक आगळावेगळा समाज प्रबोधनात्मक काव्यमैफिलीचा प्रयोग शिवाजीनगर या भागात केला.

या काव्य मैफिलीत प्रसिद्ध कवी, लेखक, साहित्यिक यांना निमंत्रित करून लिखाणातून समाजाला दिशा देता येऊ शकते, काव्यातून प्रबोधन घडू शकते, माणसाला माणसाशी जोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. माणसामाणसात प्रेम, आपुलकी, ममत्व, जिव्हाळा, आत्मियता, एकसंघ भाव निर्माण करण्याची ताकद शब्दांमध्ये आहे. शब्द हे प्रभावी माध्यम आहे, कविच्या काव्यातून ते रसिकांच्या अंतर्मनाला भिडतात. कवी आपल्या काव्यातून विविध विषयांवर समाजाचे प्रबोधन करत असतात. हा प्रबोधनाचा मानस डोळ्यापुढे ठेवून वक्रतुंड गणेश मित्र मंडळाने काव्यमैफिल आयोजित केली होती.

या काव्य मैफिलीमध्ये सुप्रसिद्ध कवी, लेखक, समीक्षक श्री.विजयकुमार पांचाळ, उपक्रमशील शिक्षक, समुपदेशक, सुप्रसिद्ध कवी रोहिदास शिखरे, कवयित्री, गझलकारा सौ सुनीताताई कपाळे, सुप्रसिद्ध कवी, लेखक, निवेदक श्री दीपक नागरे, सुप्रसिद्ध कवयित्री, आदर्श शिक्षिका सौ.जयश्री पवार, सुप्रसिद्ध हास्य कवी श्री सागर कोलते , सुप्रसिद्ध कवी, लेखक, प्राध्यापक डॉ. सुशिल सातपुते यांनी बहारदार रचना सादर करत उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्यांनी आपल्या रचनेतून समाजातील वास्तव, नात्यातील दुरावा, पावसाची रिमझिम, शेतीचे प्रश्न मांडले.

 

कवी विजयकुमार पांचाळ यांच्या भक्षक या कवितेतून जिवंत जाणिवा आणि सामाजिक भाव रसिक श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करून गेला..

“शाळेतही भय मनी

मोकळा श्वास न हवेचा

कोणते नाते श्रेष्ठ मानू

विश्वास न कोणत्या वृत्तीचा…

 

द्रौपदीचे करेल रक्षण

तो सावळा भेटत नाही

सुदर्शना तुझीच नड रे

आता तू ही फिरत नाही…”

 

समाजातील संपत चाललेली माणुसकी यावर प्रहार करत माणसाचे माणसाशी माणुसकीचे नाते जोडण्याचा प्रयत्न केला, अशी वास्तववादी रचना सादर करत, उपस्थितांची मने जिंकली.

 

यानंतर कवी डॉ सुशिल सातपुते यांनी अप्रतिम सूत्रसंचालन केले त्यानंतर आपली, बरं झालं बाप्पा ही कविता घेतली आणि रसिकांची भरभरून दाद मिळवली. आजच्या सामाजिक परिस्थितीला त्यांनी आपल्या रचनेतून समाजापुढे ठेवले.

 

“बरं झालं बाप्पा

तू पक्षात नाहीस

पक्षाचं चिन्ह म्हणून

कोणाच्या लक्षात नाहीस

 

बरं झालं बाप्पा

तुझ्याकडे कोणतं पद नाही

बरं झालं बाप्पा

तुझी पत्रकार परिषद नाही ”

 

यानंतर कवी श्री रोहिदास शिखरे यांनी लेक कविता सुरुवात करताच उपस्थित रसिकांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या, तसेच श्रोत्यांच्या मागणीनुसार ही कविता पुन्हा घेण्यात आली, इतका सुंदर प्रतिसाद या काव्य मैफिलीला मिळाला…कवितेचे बोल होते,

 

“लेकी तुझ्याविना दार

गेल्यापासून गप्पगार

भिंती सुद्धा बोलत नाही

लेकी सांत्वन त्याचे करून जा…

 

लेकी दोन दिवस येऊन जा

माहेराला राहून जा

निमित्त आहे सणाचं

गोडधोड खाऊन जा…”

 

सर्व रसिक श्रोते कविता मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.

कवयित्री सुनिता कपाळे यांनी मृद्गंध या कवितेतून, रिमझमत्या पावसावर मनमोहक शब्दात भाव व्यक्त करताना वयाला हरवून पुन्हा बालपण जगू आणि

वृक्षवल्ली जपू हा संदेश आपल्या लेखणीतून व्यक्त केला आहे.

“गंधाळल्या अवनीने

सारे अत्तर शिंपले

जपू वृक्षवल्ली सारी

हेची कर्तव्य आपले…

 

स्पर्श केला पावसाने

एका मनी घेत ठाव

पुन्हा जगू बालपण

करू कागदाची नाव…”

 

कवयित्री जयश्री पवार यांनी माहेरच्या आठवणी , गावातील मनोरम्य आठवणी रसिकांच्या मनामध्ये जाग्या केल्या..

 

काही मिळवले

काही हरवले

शोधात सुखाच्या

मी गाव विसरले..

 

यानंतर कवी दीपक नागरे यांनी बहीण भावाच्या नात्याला हृदयात जागे केले.

“दिवाळीचा सण येता

बहीण माहेरी येते

मुक्या घरट्यात भावाच्या

सुख पेरूनिया जाते

 

शेतकरी बापाच्या व्यथा त्यांनी आपल्या रचनेतून सादर केल्या. पोशिंदा किती महत्त्वाचा आहे हे जनमानसात पेरण्याचे काम केले.

शेतामधी राबताना

जातो जव्हा जीव

सांग तुला देवा का रे

येत नाही कीव”

नात्याबरोबर माणसाला जीवनात हसवण्यासाठी शब्दच फुंकर घालतात. असे विनोदी कवी सागर कोलते यांची ” गाढवात आणि माझ्यात काहीच फरक नाही ” ही एक विनोदी काव्यरचना त्यांनी घेतली आणि रसिकांमध्ये हशा पिकला

अशाप्रकारे बहारदार काव्यरचनांनी काव्यमैफिल रंगत गेली. रसिक श्रोत्यांनी मनमुराद कवितांचा आस्वाद घेतला. या प्रबोधनात्मक काव्यमैफीलचे बहारदार सुत्रसंचलन कवी प्रा.डॉ सुशिल सातपुते यांनी केले. गणेश मंडळाने अतिशय स्तुत्य असा उपक्रम हाती घेतला, अशी रसिकांमधून प्रतिक्रिया मिळाली. या कार्यक्रमाचे आयोजन वक्रतुंड गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष

शार्दुल कुलकर्णी,अनिकेत गोल्हार, अनिकेत गायकवाड, कार्तिक ठोंबरे, कृष्णा नलावडे, अमोल ढगे, अथर्व तट, ओम राठोड , परिसरातील गणेश भक्त, बाल ,वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय आनंदी आणि स्वच्छंदी वातावरणात मैफिल रंगत गेली. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य श्री अशोक राठोड सर यांनी केले तर श्री संजय सम्राट यांनी आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा