प्रशासनातील दीपस्तंभ
ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण वासनिक माणुसकीचा झरा
काही माणसे अशी असतात की ती आपली नोकरी तर सांभाळतातच पण त्याबरोबरच आपला सामाजिक बांधिलकीचा वाटाही उचलतात. बहुतांश लोक मी भला आणि माझी नोकरी भली या समीकरणात वावरतात. पण सामाजिक चळवळीत भाग घेतल्यामुळे आपले आरोग्य चांगले टवटवीत राहते हे सूत्र त्यांना गवसलेले नसते. मी माझी पत्नी व माझी मुले या चौकटीत ती वावरत असतात. या चौकटीला छेद देणारे काही लोक समाजामध्ये नक्कीच आहेत. त्यामध्ये आमच्या मिशन आय ए एस परिवारातील श्री प्रवीण वासनिक यांचा समावेश करावा लागेल.
एक आदर्श ग्राम पंचायत अधिकारी म्हणून श्री प्रवीण वासनिक यांचा नावलौकीक आहे. आपल्या कामावर वेळेवर जाणे आणि वेळ संपल्यानंतरही लोकांची कामे करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. अनेक वेळा कर्मचारी उशिरा येतात आणि लवकर जातात. कार्यालयीन वेळातच लग्नाला तेरवीला गोड जेवणाला जाऊन येतात पण प्रवीण मात्र त्याला अपवाद आहे. निष्ठेने काम करणे हा त्याचा स्थायीभाव आहे.
प्रवीणची सर्वात जास्त मला भावलेली गोष्ट म्हणजे त्याने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांनी स्थापन केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचा केलेला अप्रत्यक्ष जीर्णोद्धार.
ही शाळा शोधण्यासाठी तो पुण्याला गेला. त्याला साधारण पंचवीस वर्षे झाली असतील. ती शाळा तर सापडलीच नाही. दुसऱ्या वेळेस मात्र तो वेळ काढून गेला आणि त्या भागात बारकाईने फिरला. तेव्हा त्याला एक पाटी दिसली .त्या पाठीवर त्या शाळेचा उल्लेख होता. मुलींची पहिली शाळा पण तिथे काहीच नव्हते आणि त्यासाठी त्याने गेल्या पंचवीस वर्षापासून संघर्ष केला. पत्रव्यवहार केला. वेळोवेळी मंत्र्यांना आमदारांना लोकप्रतिनिधींना निवेदन दिले. आणि इमारत फळा आली असे म्हणावे लागेल .आता कुठे त्या शाळेला मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे .पण त्यासाठी प्रवीणला तब्बल 25 वर्ष संघर्ष करावा लागला आहे. मला वाटते प्रवीणच्या जीवनातील हे ही घटना हे एक काम त्याला जीवनामध्ये समाधान मिळून देणारे आहे.
शासकीय कामात तो तत्पर आहे. कुठलेही काम पेंडिंग नाही. कुठल्याही ग्रामस्थांची तक्रार नाही . असा वारसा लाभलेला प्रवीण सामाजिक जीवनामध्ये रुळला आहे.लेडी गव्हर्नर मातोश्री कमलताई गवईच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होण्याचा तो प्रयत्न करतो .तो शुभ्र वस्त्रधारी आहे .जसा त्याचा पोशाख आहे तसेच त्याचे मन आहे आणि ते पारदर्शक आहे. सामाजिक जीवनामध्ये वावरताना पारदर्शक जीवन जगणे किती कठीण आहे. हे तुम्हाआम्हा सर्वांना माहीत आहे. पण मन चंगा तो काठोक मे गंगा या प्रमाणे त्याची वाटचाल सुरू आहे.
तो ग्रामपंचायत अधिकारी असल्यामुळे इतरांच्या गावाबरोबर स्वतःच्या मांजरी म्हसला या बडनेराजवळ असलेल्या गावालाही विकसित करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावात एक समृद्ध असणारे वाचनालय काढून त्याने गेल्या पंचवीस वर्षात गावासाठी वेळ काढला आहे गावातील युवकांना नागरिकांना लागेल त्या सुविधा लागेल त्या योजनांची माहिती तो वेळोवेळी देत गेलेला आहे .तो जरी अमरावतीला राहत असला तरी घार हिंडते आकाशी लक्षात तिचे पिलापाशी या न्यायप्रमाणे तो गावाकडे लक्ष देऊन असतो.
प्रवीण घरी किती वेळ असतो हा खरं म्हणजे प्रश्नच आहे. कार्यालयीन वेळ होईपर्यंत तो सामाजिक कामात असतो आणि कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही त्याचे पाय नकळत सामाजिक कार्याकडे वळतात. मला आठवते आमचे ज्येष्ठ मित्र स्वातंत्र्यसंग्राम सैनिक श्री माणिकराव मोरे यांना त्याने जेवढी साथ दिली तेवढी कोणीच दिली नाही. एकतर माणिकराव वयोवृद्ध. त्यात त्यांच्याकडे गाडी नव्हती. पण प्रवीण त्यांचा सारथी झाला. आपली कार्यालयीन वेळ सांभाळून तो माणिकरावांना जिथे जिथे पाहिजे तिथे तिथे घेऊन जात होता. आज स्वतःची मुले जिथे आई-वडिलांना न्याय देऊ शकत नाहीत तिथे मात्र हा प्रवीण माणिकरावांना वडील मानत होता .केवळ मानतच नव्हता तर त्याप्रमाणे कृतीही करीत होता .आज माणिकराव आमच्यात नाहीत. पण माणिकरावसाठी प्रवीणने जे कष्ट उपासले आहेत ते शब्दातीत आहे.
कोरोना काळात जेव्हा लोक घरात बसून होते तेव्हा मात्र हा आपले कार्यालयीन काम करीत होता. पण आपल्या मदतीचा हातही लोकांपर्यंत पोहोचवत होता .कोविडच्या काळात याने पाच वेळा रक्तदान केले .तो एक उच्चांकच म्हणावा लागेल. गरजवंतांना त्याने धान्य पुरवले. भुकेलेल्यांना अन्नाचा घास दिला आणि त्याचमुळे आज प्रवीणच्या चेहऱ्यावर तृप्ती समाधान दिसत आहे.
प्रवीणला कोण्या संस्थेची गरज नाही. तोच एक चालती बोलती संस्था आहे .रस्त्याने जात असताना जर त्याला काही करण्यासारखे आढळले तर तो करतोच .अनेक वेळा त्याने रस्त्यावर असलेल्या रुग्णांना ऑटो रिक्षाने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले आहे. त्यांची चिठ्ठी काढली आहे. त्यांना औषध उपचार केले आहेत आणि हे सर्व झाल्यानंतर त्यांना अल्पोपहारही दिला आहे व घरी जायला ऑटो देखील करून दिला आहे. खरं म्हणजे हे गरीब लोक त्याच्या घरी येत नाहीत तर हाच जिथे जातो तिथे तू माझा सांगाती या न्यायाने रस्त्याने दिसणाऱ्या व मदतीची अपेक्षा असणाऱ्याला मदत करून जातो. तो गाडीवर कधी एकटा दिसणारच नाही. रस्त्याने जाणाऱ्याला लिफ्ट देणे हे त्याचे आवडते काम आहे.
प्रशासनाने वेळोवेळी त्याचा त्याच्या चांगल्या कामावर विश्वास आहे म्हणूनच त्याचा गौरवही केला आहे. प्रशासनाबरोबरच अमरावती शहरातील सामाजिक संस्थांननीही त्याच्या कार्याची दखल घेऊन त्याचा सन्मान केला आहे. बोधी वृक्षांवर प्रवीणचे असीम प्रेम आहे. म्हणून तो कोणाचाही वाढदिवस असला तर त्याला बोधीवृक्ष सप्रेम भेट देतो. अगदी परवा अमरावतीचे सुपुत्र सरन्यायाधीश श्री भूषण गवई अमरावतीला आले असताना त्यांना देखील तो बोधी वृक्ष द्यायला विसरला नाही. या बोधी वृक्षाबरोबरच त्याने पुस्तकाची जोड दिली आहे .
तुमच्या वाढदिवसाला प्रवीण कडून जर बोधी वृक्ष आणि पुस्तक मिळाले तर तुम्हाला किती बरे वाटेल. दुसऱ्याला आनंद देणारा हा खरा आनंद आहे आणि तो प्रवीणमध्ये आहे.
आणि म्हणूनच मिशन आय.ए.एस परिवारामध्ये प्रवीण एक माणुसकीचा झरा म्हणून ओळखला जातो. मला देखील एखादे काम जबाबदारीने करायचे असल्यास व मी गावात नसल्यास मी त्यासाठी प्रवीणची निवड करतो .मला खात्री असते की माझा शब्द वाया जाणार नाही आणि तो माझ्या या समजुतीला तडा जाऊ देत नाही.
खरं म्हणजे आम्ही कर्मचाऱ्यांनी आमच्या कामाला न्याय दिला पाहिजे. केवळ वेळेवर येऊन भागणार नाही तर समोर आलेल्या माणसाला समाधान देणे त्याच्या कामात त्याला मदत करणे असे प्रवीण सारखे व्रत स्वीकारले तर खऱ्या अर्थाने आपल्या भागातील ग्रामीण भागाचा विस्तार विकास झाल्याशिवाय राहणार नाही. एक आदर्श ग्राम पंचायत अधिकारी म्हणून प्रवीणचा नावलौकिक होता आहे आणि राहिलही.
प्रा. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
