*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*मोदक*
श्री गणेश म्हणजे आहारप्रिय, तुंदीलतनु देवता. त्याचे हे गोंडस रूप आपल्यालाही अतिप्रिय. भाद्रपद महिन्यात,शुक्ल पक्षात चतुर्थीच्या दिवशी मोठ्या धुमधडाक्यात वाजत गाजत,ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन होतं आणि त्या मंगलमूर्ती समोर नैवेद्याचं २१ मोदकांचं ताट सजतं. लहान थोरांपासून सर्वांनाच प्रिय असलेला हा मोदक कसा प्रचलित झाला त्या मागच्या कथाही मनोरंजक आहेत. त्यापैकी पद्मपुराणातली एक कथा अशी आहे की एकदा अमृता पासून सिद्ध केलेला दिव्य मोदक देवी देवता पार्वतीकडे घेऊन जातात. पार्वतीचे दोन पुत्र कार्तिकेय आणि गणेश दोघेही मोदकाला पाहून मोहात पडतात. त्यावेळी पार्वती त्यांना सांगते की जो धर्माचरणात श्रेष्ठ असेल त्यालाच मोदकाची प्राप्ती होईल. या संबंधातील पृथ्वी परिक्रमेची कथा आपण जाणतोच. कार्तिकेय पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघून गेला मात्र गणेशाने मातापित्यांभोवतीच प्रदक्षिणा घालून त्यांचे मन जिंकले आणि तो मोदक अर्थातच गणेशाला प्राप्त झाला, तेव्हापासून गणपती म्हणजे आवडीने मोदक खाणारा असेच प्रचलित झाले आणि गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आजतागायत टिकून आहे.
आणखी एक मोदका विषयीची आख्यायिका सांगते की परशुरामाशी झालेल्या युद्धात गणपतीचा दात तुटला म्हणून देवी पार्वतीने त्याला सहज खाता येतील असे अमृतमय लुसलुशीत मोदक खायला दिले.
गणपतीला २१ मोदकांचा नैवेद्य का दाखवतात याविषयीची सुद्धा एक रंजक कथा आहे. एक दिवस अत्रि ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसूया यांनी शंकर पार्वतीला मेहूण म्हणून जेवायला बोलावले. माता पार्वती गणोबालाही घेऊन आली. अनुसयाने सुरेख भोजनाचा बेत केला होता. शंकर-पार्वतीने जेवल्यानंतर तृप्तीची ढेकर दिली मात्र गणोबाचे काही पोट भरले नव्हते मग अनुसूयाने त्याच्या पानात लुसलुशीत दिव्य मोदक वाढले एका पाठोपाठ एक करत गणपतीने २१ मोदक गट्टम केले आणि नंतरच, “आता माझं पोट भरले” असे सांगितले म्हणूनच गणपतीला २१ मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा पडली.
याच संदर्भात आणखीही एक कथा सांगितली जाते. गणपती म्हणजे गणाधीश, गणांची देवता. गणपतीने आपल्या पानात वाढलेल्या २१ मोदकांपैकी २० मोदक गणांमध्ये वाटले आणि उरलेला एकच स्वतः खाल्ला.
थोडक्यात गणपती च्या नैवेद्यात २१ मोदक हे मात्र ठरलेलेच आहे.
“मोदक” या शब्दाची फोड केली तर मोद म्हणजे आनंद. आनंद निर्माण करणारा तो “मोदक”. थोडक्यात मोदक हे आनंदाचे प्रतीक म्हणूनही मंगलमूर्ती मोरयाला मोदक अर्पण केले जातात. जेणेकरून मानवी जीवनातल्या दुःखांचे हरण होऊन आनंदाचे झरे वहावेत ही या मागची संकल्पना.
मोदकाचे अनेक प्रकार अलिकडे आपण पाहतो. काजू मोदक, मावा मोदक, आंबा मोदक, चॉकलेट मोदक वगैरे वगैरे पण खरे मोदक म्हणजे तांदळाच्या पिठाचे उकडीचे शुभ्र पाकळीदार मोदक ज्यात गुळ आणि ओल्या नारळाचं सुगंधी सारण भरलेलं असतं. असं समजूया की उकडीचे पारिरुपी वेष्टन म्हणजे मानवी जीवन आणि आतले गुळ खोबऱ्याचं सारण म्हणजे जीवनातला निव्वळ आनंद. म्हणून मोदक म्हणजे जीवनातलं आनंदाचंच रूपक ठरतं. कणकेच्या पारितही हे गुळ खोबऱ्याचे सारण घालून तळलेले मोदक गणपतीला वाहण्याची प्रथा आहे पण उकडीच्या शुभ्र पाकळीदार लुसलुशीत मोदकाचे महात्म्य न्यारंच आहे. या उकडीच्या मोदकाची थोडक्यात कृती अशी.. एक वाटी तांदळाची पिठी.
एक वाटी पाणी
एक वाटी खोवलेला ओला नारळ.
एक वाटी किसलेला गूळ.
जायफळ वेलची पावडर, केसर हवी असल्यास सुकामेवा पावडर.
*कृती* : प्रथम भांड्यात एक वाटी पाणी उकळून त्यात तांदळाच्या पिठाची सुरेख एकजीव उकड काढावी.
कढईत एक मोठा चमचा तूप टाकून नारळ परतवून घ्यावा. गुलबट झाल्यावर त्यात गुळ घालावा. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर टाकावी . उकडीची पातळ पारी करून त्यात हे सारण भरावे आणि भोवताली छान कळ्या पाडून त्यास मोदकाचा आकार द्यावा. मोदक पात्रात वळलेलेले मोदक वाफवून घ्यावेत. एकेका मोदकावर केसराचा तार लावावा आणि गरम गरम वाढावेत. खाताना वरून चांगले लोणकढे तूप सोडावे आणि खाऊन तृप्त व्हावे. तत्पूर्वी गणेशाला मात्र “नैवेद्यम समर्पयामि” असे भक्तीभावाने म्हणत एकवीस मोदक अर्पण करावेत.
*राधिका भांडारकर*
