You are currently viewing मराठा सेवा संघाचे संस्थापक : पुरुषोत्तम खेडेकर

मराठा सेवा संघाचे संस्थापक : पुरुषोत्तम खेडेकर

एक सप्टेंबर मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त..

मराठा सेवा संघाचे संस्थापक : पुरुषोत्तम खेडेकर

 

एक सप्टेंबर हा मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन .हा वर्धापन दिन संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात संपन्न केला जातो. महाराष्ट्रातही संपूर्ण 36 जिल्ह्यात तसेच वेगवेगळ्या तालुक्यात हा वर्धापन दिन आयोजित करण्यात येतो. मराठा सेवा संघाची स्थापना श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोला येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना केली. आज या गोष्टीला 35 वर्ष पूर्ण झालेले आहेत.

प्रत्येक समाजाने आपापल्या समाजाला संघटित करावे व या संघटित समाजाने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीचे सामाजिक परिवर्तनाचे काम करावे या भूमिकेतून महाराष्ट्रातून अनेक संस्था निर्माण झाल्यात. मराठा सेवा संघ ही त्यापैकी एक.

कोणत्याही चळवळीला सक्षम नेतृत्व लाभले तर ती चळवळ निश्चितच प्रगती करू शकते आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री पुरुषोत्तम खेडेकर. ते नुसतं मराठा सेवा संघाची स्थापना करून थांबले नाहीत. तर त्यांनी इतरही समाजाला जागे केले .त्यांना त्यांच्या समाजाच्या संघटना बांधायला लावल्या आणि मराठा सेवा संघाच्या उपक्रमामध्ये त्यांनाही सहभागी करून घेतले.

 

आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघ व श्री पुरुषोत्तम खेडेकर यांचे नाव आदराने घेतले जाते .कारण श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी तन मन धनाने या चळवळीमध्ये आपले योगदान दिले आहे.

मराठा सेवा संघाच्या निमित्ताने साहेब नेहमी दौऱ्यावर असतात. नोकरीत असताना तर साहेब शुक्रवारी रात्री शनिवार रविवार घरीच नसायचे. त्यांनी मुलांना सक्त ताकीद दिली होती. मुले तेव्हा खूप लहान होती .काही झाले तरी मला फोन करायचा नाही. काहीही झाले तर स्वतः निर्णय घ्यायचा आणि तुम्हाला काही मदत लागली तर पोलिसांना फोन करायचा. मला फोन करायचा नाही. आईच्या बाबतीतही त्यांनी घेतलेली भूमिका कदाचित इतरांना पटणार नाही .त्यांच्या आई जेव्हा प्रवासाला निघाल्या. तेव्हा त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना खेडेकरांनी सांगितले. आईचे तिकडे काही कमी जास्त झाले तर तिथेच अंत्यसंस्कार करायचे .गावात आणण्याच्या भानगडीत पडू नये .इतकी कठोर भूमिका फार कमी पालक घेतील .पण ती खेडेकर यांनी घेतली. म्हणूनच खेडेकर आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कायमचे लिहिल्या गेले आहेत.

 

आज मराठा सेवा संघामध्ये जेवढे जेवढे वक्ते आहेत .तेवढे कुठल्या संघटनेमध्ये नाहीत .अगदी प्रस्थापित संस्थांमध्ये नाहीत. खेडेकरांनी त्यांना खऱ्या अर्थाने आयुष्यात उभे केलेले आहेत.

साहेब शिस्तीचे भक्त आहेत. कडक आहेत .त्यांचे शब्द प्रसंगी कोणाला लागले असतील .पण त्यामागे त्यांचे प्रेम आहे. आई आपल्याला रागावते .प्रसंगी अपशब्दही बोलते .पण तिचे आपल्यावर प्रेम आहे म्हणूनच ती बोलते. खेडेकरांची ही भावना आहे. आणि म्हणूनच आज जेव्हा मराठा सेवा संघ घराघरात पोहोचला गावागावात पोहोचला त्याचे श्रेय श्री पुरुषोत्तम खेडेकर यांना दयावे लागेल .

 

मराठा सेवा संघाची अधिवेशने पाहिले. कार्यक्रम पाहिले .तर तोंडात बोटे घालावे लागतात. इतकी अफाट गर्दी त्या ठिकाणी असते. गर्दी नव्हे दर्दी लोक येथे असतात . खेडेकरांनी इतके चांगले विचारवंत तयार केले आहेत की ते वक्ते स्टेजवर उभे राहिले तर तिथे त्यांचे विचार ऐकावेसे वाटतात.

 

माझी श्री पुरुषोत्तम खेडेकर यांची भेट अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या परिसरात झाली. मी 19 74 पासून चळवळीत सक्रिय होतो. 1990 ची गोष्ट असेल. माझे नातेवाईक श्री दामोदरपंत टेकाडे व श्री डहाणे यांनी मला बोलाविले. अमरावतीला मराठा सेवा संघाची स्थापना करण्यासाठी. त्या सभेला अकोल्यावरून श्री पुरुषोत्तम खेडेकर आले .ही त्याची माझी पहिली भेट आणि आता तर इतक्या भेटी झालेल्या आहेत की त्यांची संख्या शतकाने मोजावी लागेल.

 

तन-मन-धनाने एवढा झोकून दिलेला सामाजिक कार्यकर्ता मी अजून पाहिला नाही. कार्यालयीन कामे त्यांनी झपाट्याने उरकली. त्यामुळे त्यांच्यावर टीका करायला कोणाला वेळच मिळाला नाही. त्यांच्या दारावरची पाटी होती ती फार कमी अधिकारी लोकांच्या दारावर असते. त्यांच्या दारावर लिहिले होते. माझ्या कार्यालयात माझ्या कक्षात आत येण्यास परवानगीची गरज नाही. केवळ ही पाटी लिहून दे थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या केबिनचा दरवाजा सदैव उघडा ठेवला. ते असेपर्यंत तरी तो दरवाजा बंद झाला नाही. भारतातला हा पहिला अधिकारी असेल की ज्याने स्वतःचा दरवाजा सर्वसामान्य माणसासाठी तसेच वरिष्ठांसाठी सदैव उघडा ठेवलेला आहे. त्यामुळे हा माणूस सर्व समाजाच्या लोकांना आपला वाटायचा आणि आजही वाटत आहे .

 

माझ्यावर तर त्यांनी खूप प्रेम केले. माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला ते यायचे. भरपूर मदत करायचे आणि लोकांना सांगायचे या काठोळेकडे पहा. हा माणूस हेल्याचेही दूध काढू शकतो.

 

माझ्या कामाबद्दल त्यांना खात्री होती. म्हणून मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अधिवेशन 2008 साली जेव्हा अमरावतीला झाले तेव्हा त्यांनी त्या संमेलनाची धुरा आमच्या टीमवर सोपवली. मी तेव्हा मराठा सेवा संघाचा सरचिटणीस होतो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद करण्यासारखे ते राष्ट्रीय संमेलन झाले. सर्वांनी भरभरून मदत केली. इतकी मदत मिळाली की अधिवेशन संपल्यानंतर आमच्याजवळ सहा-सात लाख रुपये शिल्लक राहिले होते. मराठा समाजाच्याच नव्हे तर सर्व समाजाच्या लोकांनी मराठा सेवा संघाच्या या राष्ट्रीय अधिवेशनासाठी भरभरून मदत केली .

 

 

श्री पुरुषोत्तम खेडेकर हे तात्काळ निर्णय घेतात त्यामुळे ते यशस्वी होतात .वेटिंग हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही. परवा मी पुण्याला त्यांच्या सत्काराला बालगंधर्व सभागृहात जायला निघालो. तेव्हा मी श्री पोपटराव पवारांकडे हिवरे बाजार येथे थांबलो होतो. पोपटरावांनी त्यांची गाडी मला जाण्यासाठी दिली. मी पुण्याला पोहोचलो बालगंधर्व खचाखच भरले होते. बाहेरही असंख्य लोक होते. एवढी प्रचंड गर्दी झाली की साहेबांना रंगमंचावरून बाहेरच्या लॉनमध्ये येऊन लोकांचे सत्कार स्वीकारावे लागले.

 

श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराच्या लोकांना विचारपीठ मिळवून दिले आहे.अनेक लेखक निर्माण झाले. कवी निर्माण झाले .अनेक विचारपीठं निर्माण झाली. त्यांना खतपाणी घालण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.

मागे मी पुण्याला त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो. त्यांचा नातू सातव्या आठव्या वर्गातच आहे .पण त्याचे स्वतःचे ग्रंथालय आहे आणि त्याने स्वतःचे एक पुस्तक तेही इंग्रजी भाषेत लिहिले आहे. आमच्या गप्पागोष्टी झाल्या. माझ्याबरोबर संत वाङ्मयाचे अभ्यासक प्राचार्य डॉ. रा. गो .चवरे हे होते .आदरतिथ्य झाले आणि साहेब चक्क मला रोडपर्यंत माझ्या कारपर्यंत सोडायला आले. खरं म्हणजे त्यांचे निवासस्थान व फाटक यामध्ये बरेच अंतर होते. शिवाय साहेबांना चालताना त्रासही होतो. पण तो स्वीकारून त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा मला कार पर्यंत सोडवून दाखवून दिला.किती हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. नाहीतर पुण्यातले लोक जास्तीत जास्त लिफ्टपर्यंत तुम्हाला साथ देतात. फाटकापर्यंत येण्याचे सौजन्य त्यांच्याकडे असेलच असे म्हणता येत नाही. पण खेडेकर त्याला अपवाद आहेत.

 

डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी मी चळवळ सुरू केली. मी खेडेकरसाहेबांच्या कानावर ही गोष्ट टाकली. ते म्हणाले मी ताबडतोब अमरावतीला येतो. तुम्ही एका लहान सभेचे आयोजन करा .आपण हा मुद्दा रेटून धरू. त्याप्रमाणे ते आले. सभा झाली .सभेसाठी प्रा. डॉ. हरिअर लुंगे व प्रा. डॉ. अलका गायकवाड यांनी पुढाकार घेतला .दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाचे सीनियर ऍडव्होकेट श्री कमलाकांत चौधरी हे देखील दिल्लीवरून या सभेला आले. साहेबांनी पंजाबरावांना भारतरत्न मिळण्यासाठी कशाप्रकारे नियोजन करायला पाहिजे याचे मार्गदर्शन केले आणि पुढची दिशा कशी असावी ते ठरविले. आम्ही साहेबांना जेवणाचा खूप आग्रह केला. ते म्हणाले माझ्या चालकाला जेवण द्या. तुम्ही एवढा चांगला प्रस्ताव तयार केला यामुळे माझे पोट भरले.

 

आज मराठा सेवा संघ संपूर्ण भारतामध्ये फोफावला आहे. महाराष्ट्रात तर मराठा सेवा संघ एक ताकद निर्माण झालेली आहे. जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड सारख्या सशक्त उपशाखा मराठा सेवा संघाने तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर गावागावांमध्ये बँका पतसंस्था शिक्षण संस्था उभारून मराठा सेवा संघ आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे आणि याचे सगळे श्रेय जाते ते मा. श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनाच आणि म्हणून मराठा सेवा संघाच्या या स्थापना दिवसानिमित्त वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

 

प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे

माजी सरचिटणीस

मराठा सेवा संघ अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा