आरोग्य अभियानाअंतर्गत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष मार्फत सिंधुदुर्ग यांच्यामार्फत “श्री गणेशा आरोग्याचा” या आरोग्य अभियांनातर्गत जिल्ह्यामध्ये दि.27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2025 या कालावधीत सामुदायिक आरोग्य शिबिरे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सिएमआरएफ चे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयाअंतर्गत रुग्णालये, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणारी प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्यामार्फत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी आयोजीत करण्यात आलेली आहेत. या शिबिराच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी तसेच वेगवेगळ्या रक्त चाचण्या व इतर तपासण्या होणार आहेत.
आरोग्य तपासणी मध्ये एखाद्या आजाराचे निदान झाल्यास निदान झालेल्या रुग्णास पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तसेच इतर योजनेमार्फत पात्र रुग्णास ज्या योजनेच्या निकषात बसतील त्या योजनेअंतर्गत पुढील उपचाराकरीता मदत करण्यात येईल.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन “श्री गणेशा आरोग्याचा” या आरोग्य मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सिंधुदुर्ग मार्फत करण्यात येत आहे.

