देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय सुरु होणार पालकमंत्री नितेश राणे, कृषिमंत्री भरणे यांच्या उपस्थितीत बैठक
मुंबई :
देवगड येथे मत्स्य महाविद्यालय ऑगस्ट २०२५ पासून सुरु करण्यात यावे यासाठी मंत्रालयातील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे उपस्थित होते. त्यांनी या महाविद्यालयासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी केली.
बैठकीत कृषी विभागाचे सचिव विकास रस्तोगी, मत्स्योद्योग व बंदारे विकास मंत्री म्हणून पालकमंत्री ना. नितेश राणे, मत्स्योद्योग व बंदारे विकास विभागाचे सचिव, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, रजिस्ट्रार श्री. हळदवणेकर तसेच असिस्टंट रिसर्च ऑफिसर कल्पेश शिंदे सहभागी झाले होते.
या बैठकीत देवगडमधील मत्स्य महाविद्यालय सुरु करण्यासाठी लागणारी प्रशासकीय प्रक्रिया, अधोसंरचना, अभ्यासक्रम, शिक्षक व संशोधकांची उपलब्धता तसेच स्थानिक विद्यार्थ्यांना होणारे लाभ यावर सविस्तर चर्चा झाली.
पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी या महाविद्यालयामुळे कोकणातील मच्छीमार समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. तसेच या क्षेत्रातील मत्स्य व्यवसायाला संशोधन आणि तांत्रिक ज्ञानाचा नवा आयाम मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय सुरु झाल्यास कोकणातील विद्यार्थ्यांना राज्याच्या इतर भागात जावे लागणार नाही, शिवाय स्थानिक पातळीवरच रोजगारनिर्मिती आणि संशोधनाला चालना मिळेल. या निर्णयामुळे कोकणातील मत्स्य उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली.
