कुडाळ :
कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांची कार्यतत्परता पुन्हा एकदा समोर आली आहे. शिवापूर, वसुली, दुकानवाड, आंजीवडे, उपवडे या पंचक्रोशीतील जनतेने याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
सततच्या पावसामुळे या परिसरातील अनेक ब्रिज पाण्यात बुडाले तसेच मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे व इतर शहरांमधून हजारो गणेश भक्त व चाकरमानी आपल्या गावी परत येणार असल्याने त्यांच्या गैरसोयीची कल्पना घेत आमदार निलेश राणे यांनी तातडीने हस्तक्षेप केला.
आमदार राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देऊन गणेश चतुर्थीपूर्वी सर्व खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश दिले. शिवापूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली गवत व झाडझुडपे कापून मार्ग मोकळा करण्यात आला. त्यामुळे अरुंद रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळाला.
शिवापूर ग्रामपंचायत तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांनी या समस्येबाबत आमदार राणे यांना माहिती दिली. याची गंभीर दखल घेत राणे यांनी सुट्टीच्या दिवशीसुद्धा प्रशासनाकडून कामकाज करून घेतले. सुरुवातीला खड्डे बुजवले गेले होते, परंतु सलग पावसामुळे पुन्हा खड्डे पडले. तरीदेखील हे खड्डे तातडीने पुन्हा बुजवून वाहतूक निर्विघ्न करण्यात आली.
स्थानिकांच्या मते, गेल्या पंचवीस वर्षांत गणेशोत्सवापूर्वी अशा प्रकारची सेवा प्रशासनाकडून प्रथमच मिळाली आहे. श्री गणेशाच्या मूर्तींची ने-आण करताना होणारा त्रास टाळण्यासाठी तसेच चाकरमान्यांच्या सोयीसाठी आमदार राणे यांनी केलेल्या प्रयत्नांचे पंचक्रोशीतील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन काम वेळेत पूर्णत्वास नेले.
आमदार निलेश राणे यांच्या हस्तक्षेपामुळे पंचक्रोशीतील रस्त्यांची दुरुस्ती, ब्रिजवरील खड्डे बुजविणे आणि मार्ग स्वच्छ करण्याचे काम योग्यवेळी पूर्ण झाल्याने गणेश भक्त आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आमदारांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले आहे.
