You are currently viewing श्री देवी पावणाई दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात पार

श्री देवी पावणाई दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात पार

सावंतवाडी :

श्री देवी पावणाई दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा संस्थेच्या नूतन इमारतीत सोमवार, दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाली.

या सभेला संस्थेचे चेअरमन ॲड. सुरेश आडेलकर, व्हाइस चेअरमन संदीप येडेगे, संचालक मंडळातील श्री. पांडुरंग राऊळ, गजानन धुरी, रामचंद्र सावंत, अशोक सावंत, प्रकाश राऊळ, आत्माराम लाटये, रुक्मिणी सावंत, आत्माराम सैल यांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेला मार्गदर्शन करताना चेअरमन अॅड. सुरेश आडेलकर यांनी संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीचा आढावा मांडला. दिवसाकाठी अवघ्या ५ लिटर दूध संकलनाने सुरुवात करून आज ५०० लिटरपर्यंत पोहोचण्यामागे संस्थेतील प्रामाणिक आणि मेहनती शेतकऱ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे ते म्हणाले. संस्थेतून गोकुळ तसेच शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात असून, शेतकऱ्यांना पशुखाद्य सहज उपलब्ध करून दिले जात आहे.

संस्थेतून दर १० दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पेमेंट जमा केले जाते. कॉम्प्युटराइज्ड पद्धतीने बिलिंग करून सिंधुदुर्ग बँकेत सर्व शेतकऱ्यांची खाती उघडण्यात आली असून ‘कॅशलेस व्यवहार’ या संकल्पनेला संस्थेने यशस्वीपणे मूर्त रूप दिले आहे. त्यामुळे डेअरी व शेतकरी यांच्यातील नाते अधिक जिव्हाळ्याचे झाले असल्याचे मत चेअरमन यांनी व्यक्त केले.

सभेत घाटमाथा परिसरातील दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिल्यामुळे तेथील उत्पादनात वाढ झाल्याचा उल्लेख करण्यात आला. मात्र पारंपरिक पद्धतीवरच अवलंबून राहिल्यामुळे अनेक ठिकाणी व्यवसाय विस्तारास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणले. यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी लवकरच गोकुळ दुग्ध संघाच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्याचा ठराव सभेत सर्वानुमते करण्यात आला.

दुग्ध उत्पादक शेतकरी नामदेव गवळी यांनी मनोगत व्यक्त करताना, संस्थेच्या पारदर्शक कामकाजामुळे शेतकऱ्यांच्या मनात कुठलीही शंका राहत नाही. दर १० दिवसांनी खात्यावर थेट पेमेंट मिळाल्याने पेमेंटच्या प्रतीक्षेची चिंता उरत नाही, यामुळे शेतकरी समाधानी असून पुढे उत्पादन वाढीसाठी एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन केले.

सभेच्या शेवटी गणेश चतुर्थी निमित्त संस्थेच्या सर्व सभासदांना भेटवस्तू वाटप करण्यात आले. सभेत सर्व शेतकऱ्यांनी डेअरीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा